पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होतेय गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:22+5:302021-01-03T04:33:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : कोरोना काळात बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या परळीमार्गे अद्यापही सुरु ...

Ordinary passengers get strangled due to non-operation of passenger trains | पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होतेय गळचेपी

पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होतेय गळचेपी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : कोरोना काळात बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या परळीमार्गे अद्यापही सुरु न झाल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्य व परराज्यातील भाविकांना कार, ट्रक वा टेम्पो करून परळीत यावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या गेल्या १० महिन्यांपासून बंद असून, त्या सुरू करण्याची मागणी नागरिक व प्रवासी संघटनेने केली आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने परळीच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. कारोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने परळी रेल्वे स्थानकमार्गे धावणाऱ्या परळी-मिरज, परळी-पंढरपूर, परळी -अकोला, नांदेड-पंढरपूर ,परळी-आदिलाबाद, हैद्राबाद-पूर्णा या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या या रेल्वे अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे तसेच रेल्वेने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.

परळी रेल्वे स्थानकातून नोव्हेंबरपासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू केल्या नसल्याने परळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कार वा ट्रकने यावे लागत आहे. आदिलाबाद येथून ५०० भाविक दत्तजयंती दिवशी परळीत वैजनाथाच्या दर्शनासाठी ट्रक, टेम्पो करून आले होते. तसेच इतर ठिकाणांहूनही भाविक स्वतंत्रपणे वाहन करून येत आहेत. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने अनेक भाविकांना परळीला येणे गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे वैजनाथ मंदिर परिसरातील उलाढालीवरही परिणाम झाला आहे. शहरातील रिक्षा व्यवसायासह लॉजिंग, हॉटेल, फळविक्रेते व इतर व्यवसायांनाही याचा फटका बसत असल्याची माहिती वैजनाथ मंदिराचे पुरोहित नितीन राजूरकर यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाने परळीमार्गे धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात. यामुळे पासधारक, सर्वसामान्य प्रवाशांची निश्चितच सोय होईल. परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा येथे व्यवसाय, नाेकरीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचीही यामुळे सोय होईल. - जी. एस. सौंदले, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, परळी-वैजनाथ.

परळी रेल्वे स्थानकमार्गे एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु, पॅसेंजर रेल्वेगाड्यांबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Ordinary passengers get strangled due to non-operation of passenger trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.