कोळगावच्या पेयजल योजनेची मूळ संचिका गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:40 AM2019-01-29T00:40:56+5:302019-01-29T00:42:27+5:30
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय येथील कार्यकारी अभियंत्यांनी महत्वाची संचिका गहाळ झाल्यानंतरही पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्याऐवजी केवळ पोस्टाने तक्रार पाठवून हात झटकले आहेत. त्यामुळे ही योजना आणि यातील निधीमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पेयजल कार्यक्रमांतर्गत कोळगावला ९० लाख ९७ हजार ९५० रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये एक विहीर खोदली. तिला पाणी लागलेले नसतानाही पाईपलाईन केली. काम बोगस करून २०११ मध्ये कार्यरत संबंधित अधिकारी आणि समितीचे अध्यक्ष, सचिवाने २४ लाख रूपयांचा पहिला हप्ता घेतला. या कामाची माजी सरपंच उद्धव रासकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र चौकशी झाली नसल्याचे रासकर यांचे म्हणणे आहे. गत ९ वर्षांपासून अद्यापही या योजनेचा निकाल लागलेला नसून यासंदर्भात अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या योजनेचा १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता वर्ग करावयाचा आहे. मात्र, यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर येऊ नये, यासाठी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ही मुळ संचिकाच गहाळ करून टाकली आहे. यामध्ये सर्व तक्रारी आणि पुरावे असल्याचे सांगण्यात येते. धनादेशास आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचा आरोप रासकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.
संचिका गहाळ झाल्याचे समजताच संबंधित कर्मचारी, अधिका-यांची कार्यालयीन पातळीवर चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र कसलीही चौकशी न करता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शासकीय दस्ताऐवज गहाळ झाल्यास पोलीस ठाण्यात फिर्याद देणे अपेक्षित आहे. त्यात कधी व कोठून हरवली, याचा उल्लेखही असणे आवश्यक होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांकडून ठाण्यात आलेल्या पत्रात असे काहीच नमूद केलेले नसल्याचे सांगण्यात आले. यावरून हा सर्व खटाटोप केवळ १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता हडप करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करण्याची मागणीही माजी सरपंच उद्धव रासकर यांनी केली आहे.
चौकशी न करता ठाण्यात तक्रार कशी?
ज्या विभागातून संचिका गहाळ झाली, संबंधित कर्मचारी कोण, कधी गहाळ झाली, याला जबाबदार कोण, यासंदर्भात कार्यालयीन चौकशी करणे अपेक्षित असते. मात्र वरिष्ठांनी असे काहीच करता संबंधिताला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.