उस्मानाबादच्या प्राध्यापकाची परळीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:40 PM2018-03-07T18:40:11+5:302018-03-07T18:43:23+5:30
शहरातील रेल्वे स्टेशन समोरील एका लॉजमध्ये अनिलकुमार होळंबे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आले.
परळी (बीड ) : शहरातील रेल्वे स्टेशन समोरील एका लॉजमध्ये प्रा. अनिलकुमार होळंबे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे आज दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. होळंबे हे उस्मानाबाद येथे अभियांञिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. अनिलकुमार नाथराव होळंबे हे मंगळवारी दुपारी ४. ३० च्या सुमारास परळीच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये थांबले होते. आज दुपारी २ वाजेपर्यंत ते रुमच्या बाहेर आले नव्हते. यानंतर लॉजच्या व्यवस्थापकाने मास्टर चाविने रूमचा दरवाजा उघडला. तेंव्हा होळंबे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या नाक व तोंडातून फेस आलेला होता. यानंतर व्यवस्थापकाने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रूममध्ये विषारी द्रव्याच्या बाटल्या आढळून आल्या. प्रा. होळंबे हे लातूर जिल्ह्यातील रामवाडी-कोष्टगांव येथील रहिवासी होते.