अन्यथा, पाच हजार दंड व दुकानाला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:52+5:302021-03-16T04:32:52+5:30
शिरूर कासार : जिल्ह्यासह तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंध घालण्यासाठी व्यापाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही काहींनी आपली ...
शिरूर कासार : जिल्ह्यासह तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंध घालण्यासाठी व्यापाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही काहींनी आपली तपासणी करून घेतलेली नाही. नगरपंचायतीने आता कठोर भूमिका घेत १५ मार्चपर्यंत तपासणी करून घ्यावी, अन्यथा पाच हजारांच्या दंडासह दुकान सील करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने ही चिंतेची बाब समजून बीड जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत दुकान, हाॅटेलसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. शिवाय टेस्टिंग करून घेण्याचे आवाहन केले. त्याच अनुषंगाने शिरूर नगरपंचायतनेदेखील व्यापाऱ्यांना कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही व्यापारी अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते.
आता १५ मार्चपर्यंत तपासणी न केल्यास फुकटची तपासणी पाच हजारांच्या दंडाला कारणीभूत तर ठरेलच, शिवाय दुकानाला टाळे लावले जाईल. व्यापाऱ्यांनी आता तरी आपली तपासणी करून घ्यावी. आपण आपले कुटुंब तसेच इतरांनाही या महामारीपासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.