आमचे पप्पा जगात राहिले नाहीत, आता तरी आरोपींना पकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:06 PM2022-01-17T18:06:47+5:302022-01-17T18:07:18+5:30
मारहाणीतील जखमीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा पोलिसांवर रोष, एसपी कार्यालयासमोर दिला ठिय्या
बीड : आमचे पप्पा गावी एकटेच राहायचे, त्यांच्यावर हल्ला झाला, नंतर अपघात भासवला. महिन्यापूर्वी गुन्हा नोंद केलेला आहे; पण पोलीस आरोपींना शोधण्याऐवजी आम्हालाच पुरावे मागत आहेत. पप्पा आज जगात नाहीत, त्यांना जिवंतपणी न्याय मिळाला नाही; परंतु आता तरी आरोपींना अटक करा, अशा शब्दांत भावंडांनी पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला. कुप्पा (ता. वडवणी) येथील एका शेतकऱ्यावर महिन्यापूर्वी सख्ख्या भावाने जमिनीच्या वादातून हल्ला केला होता. उपचारादरम्यान, १५ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदन रोखून धरत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला.
संभाजी कारभारी वडचकर (५२, रा. कुप्पा, ता. वडवणी) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची मुलगी प्रीती संभाजी वडचकर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील व काका प्रकाश कारभारी वडचकर यांच्याशी जमिनीचा वाद होता. १३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वडील संभाजी वडचकर यांना शेतीचा व विहिरीचा मालकी हिस्सा मागण्याच्या कारणावरून प्रकाश वडचकर, आकाश वडचकर, वसंत सावंत व महादेव सावंत (सर्व रा. कुप्पा) यांनी संगनमत करून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व कुऱ्हाडीने डोके आणि चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर अपघात भासविण्यासाठी दुचाकीवरून तेलगाव रोडला दुचाकीवरून जखमी स्थितीत आणून टाकले होते. तेथून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बीडला खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, प्रीती यांच्या तक्रारीवरून वडवणी ठाण्यात या चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. संभाजी वडचकर यांची प्रकृती खालावत गेली. १५ जानेवारी रोजी पहाटे उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महिनाभरात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे वडवणी पोलिसांबद्दल नातेवाइकांनी रोष व्यक्त केला. शिवाय तपास उपनिरीक्षक जय परदेशी यांच्याकडून काढून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्याची मागणी करण्यात आली.
लेखी आश्वासनानंतर माघार
उपअधीक्षक संतोष वाळके यांनी मयत संभाजी वडचकर यांचा मुलगा श्रीशैल्य, मुली कीर्ती, प्रीती व ज्योती यांची समजूत काढली. आरोपींना अटक करण्यासह योग्य तो तपास करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर वडचकर कुटुंबीयांनी ठिय्या मागे घेतला. वडवणी पोलिसांनी धाव घेतली, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीला सुरुवात झाली. रविवारी उशिरा पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
न्यायालयाला पत्र देणार
संभाजी वडचकर यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात येणार आहे. न्यायालयाला तसे पत्र पाठविण्यात येईल. न्यायालयाच्या परवानगीने पुढील कार्यवाही केली जाईल. आरोपींचा तपास सुरु आहे.
- जय परदेशी, उपनिरीक्षक, वडवणी