बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:26 PM2019-05-14T15:26:36+5:302019-05-14T15:30:14+5:30
बीड पोलिसांची कामगिरी : चोरी, दरोड्यातील रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकचाही समावेश
बीड : चोरी, दरोड्यात चोरट्यांनी लंपास केलेला मुद्देमाल जप्त करून तो फिर्यादींना बीडपोलिसांकडून सन्मानपूर्वक परत केला जात आहे. आतापर्यंत १५ कार्यक्रमांमधून तब्बल १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. यामध्ये रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर आणि ट्रकचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दीड वर्षांपासून अखंडित सुरू आहे.
मेहनत करून कमावलेला मुद्देमाल घेऊन चोरटे अवघ्या काही क्षणात पसार होतात. त्यानंतर खचलेल्या मनाने नागरिक पोलीस ठाण्यात जावून फिर्याद देतात. पोलिसांकडून याचा तपास करण्यासाठी धावपळ केली जाते. यात काही गुन्ह्यांचा तपास लागतो तर काही तसेच प्रलंबीत राहतात. मात्र ज्या गुन्ह्यांचा तपास लागला, त्यात चोरट्यांसह त्यांच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधितांना परत मिळावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर हा मुद्देमाल परत देण्यासाठी एक सार्वजनिक मोठा कार्यक्रम घेण्याचा संकल्प जी.श्रीधर यांनी केला. त्याप्रमाणे २५ सप्टेंबर २०१७ पासून कार्यक्रम घेण्यास सुरूवात झाली. आजही ते अखंडितपणे घेतले जातात. आतापर्यंत १५ कार्यक्रम घेण्यात आले असून यामध्ये तब्बल १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना सन्मानपूर्वक परत करण्यात आलेला आहे.
दरम्यान, मंगळवारीही कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ७ लाख १८ हजार २५० रूपयांचा किंमती मुद्देमाल परत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव यांच्या हस्ते हा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला. सुत्रसंचालन सपोनि दिलीप तेजनकर यांनी केले. पोह राम यादव, गणेश हंगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी पोलीस अधीकारी, कर्मचारी, क्राईम मोहरील, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्राईम मोहरील परिश्रम घेत आहेत.
विविध गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल सन्मानपूर्वक परत केल्यामुळे समाधान तर आहेच शिवाय आमची प्रतीमा उंचावून नागरिकांचा विश्वास जिंकला जात आहे. आतापर्यंत १ कोटी ९ लाख ३६ हजार ६११ रूपयांचा मुद्देमाल १५ कार्यक्रमांतून परत केला आहे. यापुढेही असे कार्यक्रम घेतले जातील. यामध्ये क्राईम मोहरीरची भूमिका खुप महत्वपूर्ण आहे.
- जी.श्रीधर,पोलीस अधीक्षक, बीड