आष्टीत लंपीचा प्रादुर्भाव, ४५ गावांतील २० हजार जनावरांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:38 IST2022-09-19T13:38:45+5:302022-09-19T13:38:57+5:30
बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरावरील ८५ गावांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आष्टीत लंपीचा प्रादुर्भाव, ४५ गावांतील २० हजार जनावरांचे लसीकरण
- नितीन कांबळे
कडा (बीड): लंपी स्कीन संसर्गजन्य आजाराने आष्टी तालुक्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत १२ गावातील जनावरे लंपीने बाधित झाल्याने शेतकरी व दुग्ध व्यवसायिक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, पशुधन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तब्बल २० हजार जनावरांचे लसीकरण केले आहे.
आष्टी तालुक्यात आता लंपी स्कीन आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कडा, आष्टा, देवळाली, इमनगांव फत्तेवडगांव, डोंगरगण, कासेवाडी, सुर्डी, जामगांव,आष्टी, चिंचेवाडी, टाकसिंग यासह एकूण १२ गावांत लंपी बाधित जनावरे आढळून आली आहेत. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी उपाययोजनांवर भर देत आहेत. जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून शेतकर्यांनी खबदरारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत ४५ गावातील २० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले आहे. बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरावरील ८५ गावांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.