अंबाजोगाईत डेंग्यू , चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:48+5:302021-07-28T04:34:48+5:30
आतापर्यंत डेंग्यूचे ४० रुग्ण कोरोनानंतरचे आव्हान : शहरी, ग्रामीण भागात ४० रुग्ण आढळले अंबाजोगाई : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ...
आतापर्यंत डेंग्यूचे ४० रुग्ण
कोरोनानंतरचे आव्हान : शहरी, ग्रामीण भागात ४० रुग्ण आढळले
अंबाजोगाई : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता अंबाजोगाई शहरात व परिसरात डेंग्यू व चिकनगुनियाने तोंड वर काढले आहे. शहरी व ग्रामीण भागात आतापर्यंत डेंग्यूचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. नगर परिषद व ग्रामपंचायतीकडून धुरळणी व फवारणी नियमित होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास स्थिती गंभीर होणार आहे.
कोरोनाचा प्रकोप कमी होत असतानाच आता डेंग्युचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत. अंबाजोगाई शहरातील व तालुक्यातील विविध परिसरात डेंग्यू बाधितांचे प्रमाण वाढत आहे. या परिसरात पाण्याची डबकी साचत असून, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने, पावसाळ्यात डेंग्युचा
प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात स्वच्छता करण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. हा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच नगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. फवारणी, धुरळणी करावी, डेंग्युचे प्रमाण वाढण्यापूर्वीच दाट वस्ती तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी धुरळणी, फवारणी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे, तरच हा आजार आटोक्यात येऊ शकतो, अन्यथा कोरोनानंतर नागरिकांना डेंग्युचा सामना करावा लागेल.
काळजी घ्यावी
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात गेल्या महिनाभरात डेंग्यूचे ४० तर चिकनगुनियाच्या २२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी ही साथ येते; मात्र वेळीच स्वछता व इतर ठोस उपाययोजना आखल्या तर ही साथ नियंत्रणात येते. डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्यास तत्काळ स्वाराती रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा. हा आजार पूर्णपणे बरा होतो; मात्र दक्षता बाळगणे गरजेचे आहे. - डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, मेडिसिन विभाग प्रमुख, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.
अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार
महिन्याभरापासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वातावरणातील बदलामुळे डेंग्यू पसरविण्याच्या एडियस इजिप्टॉय डासांचा उद्रेक वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात महिनाभरात आजपर्यंत ४० रुग्ण आढळले आहेत. तर शहरातील खासगी रुग्णालयातही अनेक डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी काही जणांचे अहवाल डेंग्यूचे आढळून आले आहेत. शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.