आई-वडिलांचा आक्रोश, मित्रपरिवार गहिवरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:18+5:302021-08-20T04:39:18+5:30
बीड : नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्वप्निल महारुद्र ...
बीड : नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे (२६) यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. तो रँगिंगचा बळी ठरल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. दरम्यान, स्वप्निलवर बीडच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला तर मित्र परिवारालाही गहिवरून आले.
डॉ. स्वप्निल शिंदे हा एम.डी. स्त्रीरोग विद्या शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. १७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता मेडिकल कॉलेजच्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात तो बेशुध्दावस्थेत आढळून आला. रुग्णालयाच्या अतिदक्षात विभागात उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. मयत स्वप्निलचे वडील महारुद्र शिंदे यांनी त्याचा घातपात झाल्याचा आरोप करत १८ ऑगस्ट रोजी आडगाव ठाण्यात तक्रार दिली. यात डॉ. स्वप्निलचा दोन महिला डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख आहे. डॉ. स्वप्निलची रँगिंग सुरू होती. त्यातून त्याचा घातपात केल्याचा आरोप महारुद्र शिंदे यांनी केला. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.
व्हिसेरा अहवालाअभावी अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला नाही. दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता डॉ. स्वप्निलचा मृतदेह बीडमध्ये आणला गेला. शहरामधील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निल एकुलता एक मुलगा होता. मोठ्या मेहनतीने त्यास डॉक्टर केले होते. आई सत्यशीला व वडील महारुद्र शिंदे यांनी हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थित नातेवाईक व मित्रांना हुंदके आवरता आले नाहीत.
....
सीबीआय चौकशी करा
स्वप्निलच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने ज्या पध्दतीने आरोप केले. त्यास मानसिक रुग्ण ठरविण्याचा प्रयत्न केला तो वेदनादायी आहे. त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली गेली आहे. रँगिंगबाबत त्याने केलेल्या तक्रारीवर अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी वेळीच पाऊल उचलले असते तर तो वाचला असता. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) चौकशीची मागणीदेखील करणार आहे.
- महारुद्र शिंदे, डॉ. स्वप्निलचे वडील
.....