संतापजनक! सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:03 PM2024-01-09T16:03:59+5:302024-01-09T16:04:12+5:30
चिमुकलीस पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परळी : येथून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर सहा महिन्याच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास उघडकीस आली आहे. माता ना तू वैराणी असा काहीसा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
परळीच्या मालेवाडी गावाच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये लाल बेडशीटमध्ये गुंडाळलेले जिवंत मूल असल्याची माहिती सोमवारी रात्री ८ वाजता परळी ग्रामीण पोलिसांना फोनवरून कळाली. लागलीच पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस कर्मचारी सुनील अन्नमवार हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केले असता सहा ते आठ महिन्यापूर्वी जन्मलेली मुलगी त्यामध्ये आढळून आली.
चिमुकलीस पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी चिमुकलीस अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी दुपारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.