संतापजनक! 'ती' अल्पवयीन पीडिता अनेकांची 'शिकार'; जबाबातून धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:13 IST2025-04-07T19:12:49+5:302025-04-07T19:13:37+5:30
आठ दिवसापूर्वी पीडितेने सकाळच्या दरम्यान राहत असलेल्या मावशीच्या घरी विषारी द्रव्य प्राशन करत टोकाचे पाऊल उचलले होते.

संतापजनक! 'ती' अल्पवयीन पीडिता अनेकांची 'शिकार'; जबाबातून धक्कादायक माहिती उघड
कडा (बीड): मावशीच्या घरी शिक्षणासाठी आलेली १५ वर्षीय मुलगी एकाच गावातील अनेकांकडून वासनेची शिकार बनल्याची धक्कादायक बाब तिने दिलेल्या जबाबातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, 'ती' अल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती आहे. तर यातील दोघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावात मावशी राहत असलेल्या ठिकाणी वनिता (नाव बदलले) ही शिक्षणासाठी आली होती. तिथे राहून मावशीला घरकामाला मदत करून शिक्षण घेत होती. पण याच काळात गावातील एकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून वनिता सहा महिन्याची गर्भवती राहिली. आष्टी पोलिस ठाण्यात ३ एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी पीडितेला न्यायालयात जबाब देण्यासाठी हजर केले असता तिने आणखी इतरांनी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोवळ्या वयात तिच्यावर अनेकांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आष्टी पोलिसांनी दत्तात्रय ऊर्फ पप्पू नवनाथ जाधव, सोहम सुधीर खलाटे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
तिने उचलले होते टोकाचे पाऊल !
आठ दिवसापूर्वी पीडितेने सकाळच्या दरम्यान राहत असलेल्या मावशीच्या घरी विषारी द्रव्य प्राशन करत टोकाचे पाऊल उचलले होते. तिच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानी एमएलसीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे नमूद केले होते. उपचार घेऊन घरी येताच पीडितेने ३ एप्रिलच्या रात्री आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने एकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता.