क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:10+5:302021-06-16T04:45:10+5:30
अंबाजोगाई : कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पाहिजे त्या प्रमाणात वेळात येत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. ...
अंबाजोगाई : कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पाहिजे त्या प्रमाणात वेळात येत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. याचा फायदा घेत काळी-पिवळीसह ट्रॅव्हल्समध्ये जागेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जातात. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
....
ऑटोरिक्षा चालक मदत अभावी अडचणीत
अंबाजोगाई : लॉकडाऊन काळातही ऑटोरिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. शहराच्या विविध भागात ऑटोरिक्षा उभ्या राहतात. मात्र सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑटोरिक्षा व्यावसायिकांचा व्यवसाय संथगतीने सुरू आहे. शाळा महाविद्यालय बंद असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने रिक्षाचालकांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
.....
एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
अंबाजोगाई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून पहिली ते पीजी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत देऊन त्यांना दिलासा मिळावा, यासाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान, शुल्काबाबत काही तक्रार असल्यास अपील करण्यासाठी विभागीय शुल्क नियामक समिती गठित करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
.....
संमिश्र वातावरणाचा नागरिकांना त्रास
अंबाजोगाई : कोरोना पाठोपाठ आता बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट आटोक्यात आले आहे. या वातावरणामुळे आजारपणात वाढ होऊ लागली आहे. कधी ऊन तर कधी आभाळ अशा संमिश्र वातावरणाचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
.....
अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहरातील काही भागात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेमुळे डास व मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या कडेलाच कचरा फेकून दिला जात असल्याचे दिसत आहे.
....
पीक कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये
अंबाजोगाई : तालुक्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकरी पीक कर्ज मागणीसाठी हजेरी लावत आहेत. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. यासाठी बँकांकडून कर्ज मागणी होत आहे. जिल्हा बँक वगळता इतर कोणत्याही बँकेकडून पूर्ण क्षमतेने यंदा कर्ज देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचीही कर्जासाठी धावपळ होत आहे.
....
ग्रामपंचायतींनी घंटागाड्या सुरू कराव्यात
अंबाजोगाई : शहरालगतच्या घाटनांदूर, बरदापूर, जोगाईवाडी, मोरेवाडी परिसरात मोठ्या संख्येने रहिवासी वसाहती आहेत. नागरिकांची संख्या वाढत असताना येथील कचऱ्याची समस्याही पुढे येत आहे. कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्या नसल्याने नागरिक येथील मोकळ्या जागा व रस्त्यांच्या कडेला कचरा टाकत आहेत. यामुळे रस्तेच कचरा कुंड्या बनल्या आहेत. या ग्रामपंचायतींना कचरा कुंड्या व घंटागाड्या देण्याची गरज आहे.
....
पावसाळ्यात सांभाळा गुरांचे आरोग्य
अंबाजोगाई : पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सांभाळावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुंडे यांनी दिला आहे. पावसाळ्यात जनावरांच्या खाद्यात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार, आजार निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतर नुकतेच गवत उगवलेले असते. गवताची उंची जास्त नसल्याने जनावरांचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात. असे झाल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत व आपले नुकसान टाळावे.