काटाकाटीच्या राजकारणाचा उमेदवाराला फटका; बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादीला चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 07:32 PM2019-04-15T19:32:04+5:302019-04-15T19:36:17+5:30
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काटाकाटीचे राजकारण जोरात
- सतीश जोशी
बीड : बीड लोकसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काटाकाटीचे राजकारण अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केले. या राजकारणाचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे.
केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आ. संगीता ठोंबरे प्रचारात सक्रिय सहभागी असतानाही लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. अंजली घाडगे यांची अनपेक्षित ‘एन्ट्री’ झाली. डॉ. घाडगे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून ठोंबरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मतेही घेतली होती. आता घाडगे ह्या भाजपा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार करीत आहेत. यामुळे आ. ठोंबरे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
बेरजेचे राजकारण करताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न केला असला तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली नाराजी दूर करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेवराईत भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवार यांचे प्रभुत्व असताना देखील त्यांनी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांना झुकते माप दिले. परिणामत: लक्ष्मण पवार यांनी अनेकदा उघड-उघड नाराजी दाखविली. आता या दोघांनाही एकत्र आणताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली असली तरी दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मोहन जगताप यांना प्रवेश देऊन तेथील भाजपाचे विद्यमान आ. आर.टी. देशमुख यांच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले. माजलगावमधून देशमुखांसह रमेश आडसकर हेही आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे बीडचे स्थानिक आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि आ.सुरेश धस यांना पक्षापासून दूर जावे लागले. क्षीरसागर बंधू युतीच्या वाटेवर असून, त्याचा फटका उमेदवार बजरंग सोनवणे यांना बसत आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक संदीप क्षीरसागर यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सेनेचे माजी आमदार सुनील धांडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे.
आष्टीतही संभ्रम
आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आ. भीमराव धोंडे आणि आ. सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी एकत्र आणले असले तरी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण दोघांच्याही कार्यकर्त्यांत निर्माण झाले आहे. मध्यंतरी या दोघांनीही एकाच पक्षात असताना जाहीररीत्या आरोप-प्रत्यारोप केले होते. बीड लोकसभा मतदारसंघात दोन्हीही पक्षातील नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दिसत आहे.