ऑक्सिजन तुटवडा; मागणी २५ हजार लिटर लिक्विडची अन् आले केवळ १५ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:05+5:302021-04-22T04:35:05+5:30
बीड : जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी लिक्विडची मागणी केली जात आहे. जिल्ह्याला २५ हजार लिटरची मागणी करण्यात ...
बीड : जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी लिक्विडची मागणी केली जात आहे. जिल्ह्याला २५ हजार लिटरची मागणी करण्यात आली होती. परंतु बुधवारी केवळ १५ हजार लिटर मिळाले. बुधवारीही प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा औरंगाबाद, पुण्याहून आणखी ११ हजार लिटर लिक्विड येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या कोराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी लागणारे लिक्विडचाही प्रचंड तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून लिक्विड मिळविण्यासाठी पुणे, औरंगाबाद, लातूरला संपर्क केला जात आहे. जवळपास २५ हजार लिटर लिक्विडची मागणी करण्यात आलेली आहे; परंतु बुधवारी दुपारी केवळ १५ हजार लिटर लिक्विड मिळाले होते. रात्री उशिरा औरंगाबादहून ५ हजार, तर पुण्याहून आणखी ६ हजार लिटर असे ११ हजार लिटर लिक्विड येणार होते.
दरम्यान, बुधवारी आलेल्या १५ हजार लिक्विडमधून १५०० ते १६०० जंबो सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल, असे औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक ऑक्सिजन लागत असताना केवळ लिक्विड नसल्याने प्लांट बंद आहे. त्यामुळे येथे सध्या सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरविले जात आहे. सध्या रेमडेसिविर इंजेक्शन, खाटा आणि ऑक्सिजनची प्रचंड मागणी आहे; परंतु ते मिळत नसल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. हे सर्व उपलब्ध करण्यासाठी प्रशासन मात्र, धावपळ करीत असल्याचे दिसते.
ऑक्सिजनची मागणी अडीच कोटी लिटरकडे
सध्या बाधितांची संख्या वाढत आहे. रोज जवळपास अडीच हजार लिटर ऑक्सिजनची मागणी होत आहे; परंतु लिक्विड तुटवडा आणि रिकामे सिलिंडर नसल्याने नियोजन करताना प्रशासनाला अडचणी येत आहेत.
...
लिक्विडची २५ हजार लिटरची मागणी केली आहे. बुधवारी दुपारी १५ हजार लिटर लिक्विड पुण्याहून आले. यातून १५०० ते १६०० जंबो सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल, तसेच रात्री उशिरा औरंगाबादहून ५ हजार, तर पुण्याहून आणखी ६ हजार लिटर असे ११ हजार लिटर लिक्विड येणार आहे.
- रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड