ऑक्सिजन पडला बंद; परिचारिका म्हणाली... ही माझी जबाबदारी नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:17 PM2021-05-22T19:17:23+5:302021-05-22T19:18:45+5:30

वडवणी तालुक्यातील एक २९ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत आहे.

Oxygen fell off; The nurse said ... this is not my responsibility! | ऑक्सिजन पडला बंद; परिचारिका म्हणाली... ही माझी जबाबदारी नव्हे!

ऑक्सिजन पडला बंद; परिचारिका म्हणाली... ही माझी जबाबदारी नव्हे!

Next
ठळक मुद्दे नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सीईओ, सीएस, एसीएस धावले

बीड : कोरोनाबाधित रुग्णाचा ऑक्सिजन अचानक बंद पडला. याबाबत नातेवाईकांनी विनंती केल्यानंतरही परिचारिकेने, हे आपले काम नाही, असे सांगत हात झटकले व या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. त्यानंतर हवालदिल नातेवाईकांनी याबाबत तक्रार केली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. हा प्रकार वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. आता या वॉर्डमधील दोन नर्सवर कारवाईची टांगती तलवार आहे.

वडवणी तालुक्यातील एक २९ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत आहे. दोन दिवसांपासून तो ऑक्सिजनवर आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ऑक्सिजन पुरवठा बंद पडला, त्यामुळे रुग्णाला त्रास सुरू झाला. त्याने हा प्रकार तात्काळ मोबाईलवरून नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी धाव घेतली व येथील सोनाली पवार या परिचारिकेकडे ऑक्सिजन लावण्याची विनंती केली. यावर त्यांनी, हे काम वॉर्डबॉयचे आहे, असे सांगून दुर्लक्ष केले. यावर याच वॉर्डमधील दुसरी परिचारिका दीपांजली काळे यांनीही, नातेवाईक म्हणतच असतात, आपण दुर्लक्ष करायचे, असे सांगत ऑक्सिजन लावण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार मेट्रन संगीता दिंडकर यांना कळवताच परिचारिकांनी तात्काळ ऑक्सिजन लावला.
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी या गंभीर प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना माहिती दिली. कुंभार यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सुखदेव राठोड यांनी वॉर्डात धाव घेतली. नातेवाईक व परिचारिका यांना समोरासमोर उभे करताच सर्व चुका निदर्शनास आल्या. यावर डॉ. गित्ते यांनी या दोन्ही कंत्राटी परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना डॉ. राठोड यांना दिल्या. परंतु, शुक्रवारी उशिरापर्यंत याबाबत आदेश निघाले नव्हते.

नातेवाईक बाहेर, आतमध्ये अनागोंदी कारभार
संसर्ग वाढत असल्याचे कारण सांगत प्रशासनाने नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्यास बंदी घातली. परंतु, आतमध्ये परिचारिका, डॉक्टर रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांवर विश्वास नसल्यानेच नातेवाईक आत जाण्याचा हट्ट धरत असल्याचे दिसते. आरोग्य विभाग स्वत:च्या अनागोंदी कारभारावर पांघरूण घालण्यासाठी पोलिसांना पुढे करत असल्याचे दिसते.

वॉर्ड क्रमांक ६ मधील दोन्ही परिचारिकांना टर्मिनेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे आदेश निघतील.
- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: Oxygen fell off; The nurse said ... this is not my responsibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.