स्वाराती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:44+5:302021-04-28T04:36:44+5:30

परळी : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून ...

Oxygen plant operated at Swarati Hospital | स्वाराती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित

स्वाराती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित

googlenewsNext

परळी : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट मंगळवारी कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्लांटद्वारे दर दिवसाला २८८ जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन हवेतून वेगळा करून निर्माण होणार आहे. याद्वारे रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या ४० टक्के ऑक्सिजन निर्माण होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांच्यासह उर्जा राज्य मंत्री प्रजक्त तनपुरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांसह आदी उपस्थित होते.

या ऑक्सिजन प्लांट मूळे रुग्णालयाला लागणारा ४० टक्के ऑक्सिजन मिळेल, उर्वरित ऑक्सिजनचा सध्या विविध माध्यमातून पुरवठा सुरू असून तो ऑक्सिजनदेखील इथेच निर्माण केला जावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे शिफ्टिंग करणे शक्य नाही, मात्र तेथे सिलेंडर फिलिंग युनिट उभारून तेथून अन्यत्र सिलिंडर पुरवठा केला जाऊ शकतो, याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती मुंडे यांनी तनपुरे यांना केली. याबाबतही ऊर्जा विभाग तातडीने सकारात्मक निर्णय घेईल तनपुरे म्हणाले.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, जिल्हा प्रशासन व ऊर्जा विभागाशी चर्चा करून धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेत परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई रुग्णालयात शिफ्ट केला, याचा फायदा आरोग्य यंत्रणेला होईलच. ऊर्जा विभागाने याच संकल्पनेतून परभणी येथेही असाच एक प्लांट शिफ्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच राज्यातील अन्य औष्णिक विद्युत केंद्रांतील प्लांट देखील शिफ्ट करून त्यांची मदत आरोग्य विभागाला होईल यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, असे यावेळी बोलताना ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Web Title: Oxygen plant operated at Swarati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.