सोळंके साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:12+5:302021-05-09T04:35:12+5:30
या प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात सोळंके म्हणाले, राज्यातील सध्याची कोविडची परिस्थिती विचारात घेता कोविड रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ...
या प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात सोळंके म्हणाले, राज्यातील सध्याची कोविडची परिस्थिती विचारात घेता कोविड रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज आहे. राज्य व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना पुरेसा व वेळेत झाल्यास रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे. राज्य व देशासमोर उभ्या राहिलेल्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीसाठीचे प्रकल्प तातडीने उभे करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व शासनाने साखर उद्योगास आवाहन केले होते. कारखान्याकडे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प असल्याने कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य आहे. त्यामुळे संचालक मंडळाने दैनिक २५ घनमीटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारणीचा धोरणात्मक निर्णय घेतला. या प्रकल्पाचा सिव्हील कामासह एकूण प्रकल्प खर्च जवळपास ६० लाख रुपये आहे. आवश्यक त्या परवानग्या घेऊन हा प्रकल्प उभारणीसाठी अनुभवी एजन्सीला सुचित केले आहे.
कारखान्यात या प्रकल्पाची मेअखेर उभारणी होऊन ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. त्यामुळे दररोज १२ किलोंचे ८० ते ९० सिलिंडर उपलब्ध होतील. आवश्यकतेनुसार बाहेरील सरकारी व खासगी रुग्णालयास ते उपलब्ध करून देता येतील. यामुळे या आणीबाणीच्या परिस्थितीत ग्रामीण व निमशहरी भागाला चांगला लाभ होईल, असेही आ. प्रकाश सोळंके म्हणाले.