ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:16+5:302021-04-17T04:34:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत असताना प्रशासन आणि शासन सुविधा व सेवा पुरविण्यात अपयशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत असताना प्रशासन आणि शासन सुविधा व सेवा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. लस, रेमडेसिविर इंजेक्शन आणि लसीचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. असे असले तरी उपाययोजना करण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत असून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधितांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा अधिकारीच काळाबाजार करीत आहेत. त्यामुळे ते इंजेक्शन मिळत नाही. तसेच खाटा आणि ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. शासनाकडून लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जात आहे; परंतु जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. सध्या या तीनही महत्त्वाच्या गोष्टींचा तुटवडा जाणवत असल्याने सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. इंजेक्शन, लस आणि ऑक्सिजन व खाटांची उपलब्धता करण्याची मागणी होत आहे.
ऑक्सिजन : १००० सिलिंडरची मागणी, मिळतात केवळ ६००
जिल्हा रुग्णालयात सध्या दररोज सरासरी एक हजार सिलिंडरची मागणी आहे; परंतु प्रशासनाला केवळ ६०० सिलिंडर मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजनच्या खाटाही अपुऱ्या पडत आहेत. प्रशासनाकडून याबाबत उपाययोजना केल्याचा नुसताच बोभाटा केला जात आहे.
पुढे काय?....प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर मृत्युदर वाढण्याची शक्यता.
रेमडेसिविर : मागणी १ हजार इंजेक्शनची; मिळतात १००
कोरोनाबाधित व संशयितांवर उपचारात सध्या रेमडेसिविरचा सर्वांत जास्त फायदा होत आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. जिल्ह्यात रोज १ हजार इंजेक्शनची मागणी आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ १०० च मिळतात. त्यातही काळाबाजार होत आहे. यात औषध प्रशासनाचेच अधिकारी मिलिभगत करीत आहेत.
पुढे काय?.... प्रशासन आणि शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
लसीकरण : साठा नसल्याने सामान्यांची होतेय धावपळ
जिल्ह्यात कोरोना लसीचाही तुटवडा जाणवत आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांयसह प्रत्येक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. परंतु सध्या तुटवडा असल्याने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. लस नसल्याने सामान्यांची धावपळ होत आहे.
पुढे काय?.... लस उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दोन लाख डोस मागवले
मागील आठवड्यात काही प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर मागणी केली. सध्या बऱ्यापैकी लस आहे. काही ठिकाणी थोडाफार तुटवडा आहे. आता आणखी दोन लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. तीदेखील लवकरच येईल. रेमडेसिविर आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मला जास्त काही सांगता येणार नाही. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारावे.
- डॉ.संजय कदम
नाेडल ऑफिसर, लसीकरण, बीड
===Photopath===
160421\16_2_bed_13_16042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात एका वृदध महिलेला दुचाकीवरून आणण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडविले. त्यांना दाखल करण्यासाठी नातेवाईकांची धावपळ झाली.