खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:41+5:302021-04-17T04:33:41+5:30
अंबाजोगाई : खासगी रुग्णालयांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद करण्यात आल्याने नॉन कोविड रुग्णांवर उपचार करताना मोठे ...
अंबाजोगाई : खासगी रुग्णालयांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद करण्यात आल्याने नॉन कोविड रुग्णांवर उपचार करताना मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. यासाठी खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉक्टर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात कोविड व नॉन कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे,असे रुग्ण शासकीय रुग्णालयात व शासनाने मान्यता दिलेल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, जे रुग्ण हृदयविकार, मधुमेह, दमा व विविध आजारांनी त्रस्त अशा रुग्णांना शहरातील अनेक खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे नॉनकोविड रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाहीत. अशा स्थितीमुळे खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. खासगी रुग्णालयात उपचार करताना अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा खासगी रुग्णालयासाठी बंद ठेवण्यात आल्याने रुग्ण सेवेत मोठे अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी खासगी डॉक्टरांना शासनाच्या वतीने पूर्ववत ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉक्टर संघटनेने केली आहे.