लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात अडीच वर्षे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:35 AM2021-07-28T04:35:10+5:302021-07-28T04:35:10+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण अद्यापही कासवगतीने सुरू आहे. आठवड्याला केवळ २० ते २५ हजार डोस येत आहेत. त्यामुळे ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण अद्यापही कासवगतीने सुरू आहे. आठवड्याला केवळ २० ते २५ हजार डोस येत आहेत. त्यामुळे केंद्रावर आल्यानंतरही लाभार्थ्यांना लस मिळत नाही. लसींचा तुटवडा असल्याने लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. हीच गती कायम राहिली तर जिल्ह्यातील पूर्ण लोकांचे लसीकरण होण्यासाठी अंदाजे अडीच वर्षे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सर्वांत अगोदर हेल्थ केअर वर्कर्स, नंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास २१ लाख लाभार्थी आहेत. या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्याला लसीचे अपुरे डोस प्राप्त होत आहेत. त्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ सहा लाख ८६ हजार लोकांनी डोस घेतला आहे. अशीच कासवगती सुरू राहिल्यास दोन्ही डोस पूर्ण करायला अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यासाठी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
०००
वरच्या पातळीवरूनच लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. लस आली की लगेच सर्व केंद्रांवर पाठवून देण्याच्या सूचना केल्या जातात. आम्ही तर वारंवार डोस वाढवून मागतच आहोत. आतापर्यंत सहा लाख ८६ लोकांना लस देण्यात आली आहे.
- डॉ. रौफ शेख, नोडल ऑफिसर, बीड
०००
आतापर्यंत झालेले लसीकरण
गट पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १७८८१ ११२६५
फ्रंटलाईन वर्कर्स ३३८७० १८१४३
१८ ते ४४ वयोगट १५३४९७ १५०७०
४५ ते ५९ १३६७७२ ५४५१३
६०पेक्षा जास्त १८५७८० ६०१५६
०००
जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्रे ७३
270721\27_2_bed_3_27072021_14.jpeg
वडवणी तालुक्यातील कुप्पा आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी दिसत आहे. शुक्रवारी घेतलेले छायाचित्र.