लसीकरणाची कासवगती; गरज दररोज ३० हजार डोसची अन् सध्या जिल्ह्यात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:19+5:302021-05-09T04:35:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची उडी पडत आहे. रोज जवळपास ३० हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची उडी पडत आहे. रोज जवळपास ३० हजार डोसची गरज आहे. परंतु सद्य:स्थितीत लसीचा ठणठणाट असून, नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. राज्य व केंद्राकडून डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. हे डोस जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध होते; परंतु तेव्हा मनात गैरसमज असल्याने लोक पुढे येत नव्हते. आता सकारात्मक संदेश जात असल्याने सर्वच लोक केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यातच १८ ते ४४ वयोगटांतील लोकांनाही लस देण्याचे घोषित झाल्याने केंद्रांवर आणखीनच गर्दी वाढली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या पाहता लसीचे डोसच उपलब्ध हाेत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच ५६ हजार डोस प्राप्त झाले होते; परंतु अवघ्या काही तासांत ते संपले. १८ वर्षांवरील लाभार्थ्यांना मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे.
ग्रामीणची लस संपली
१८ ते ४४ वयोगटांसाठी केवळ तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र केले आहेत, तर ४५ वरील वयोगटासाठी जिल्ह्यात १४३ केंद्र तयार केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात ५६ हजार डोस आले हाेते. ग्रामीण भागातील सर्वच केंद्रांवरील डोस संपले आहेत, तर शहरांतीलही केवळ मोजक्याच केंद्रांवर बोटावर माेजण्याइतकेच डोस शिल्लक आहेत. गर्दी होईल, या भीतीने लसीकरण सुरू करण्यासह आखडता हात घेतला जात आहे.
१८ वर्षांवरील लोकांना अपॉईंटमेंट मिळेना
१८ ते ४४ वयोगटांतील लोकांना राज्य शासनाकडून लस दिली जात आहे. परंतु, आतापर्यंत केवळ केवळ १९ हजार डोस प्राप्त झाले आहेत. या वयोगटासाठी १० केंद्रे केली असून, एका केंद्रावर रोज २०० डोस दिले जात आहे. विशेष म्हणजे लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागत आहे. स्लॉट ओपन होताच अवघ्या काही मिनिटांत तो पूर्ण होतो. त्यामुळे या वयोगटातील लोकांमध्ये संताप असून, लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
लसीकरण दहापासून; रांग मात्र रात्रीपासूनच
जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी सर्वच लोक पुढे येत आहेत. प्रत्येक केंद्रावर साधारण सकाळी १० वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात होते. परंतु, काही केंद्रांवर लोक रात्रीपासून केंद्राबाहेर रांग लावत आहेत. आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा आरोग्य केेंद्राबाहेर हा प्रकार समोरही आला आहे. तसेच इतर केंद्रांवरही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. यात ज्येष्ठ नागरिकांना मानिसक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, संताप व्यक्त होत आहे.
तरुण, ज्येष्ठही वैतागले
राज्य आणि केंद्राने त्यांचे वाद बाजूला ठेवून आम्हाला लस द्यावी. आतापर्यंत दोन वेळा रांगेत उभा राहिलो; पण लस मिळाली नाही. ऑनलाईन अपॉईंटमेंट मिळत नाही. मग काय मरावे का? आम्हाला काही माहिती नाही, आमच्या लसीची सोय शासनाने लवकर करावी.
- मंगेश काळे, बीड
जिल्हा रुग्णालयात गेलो तर बसायला जागा नव्हती. रांगेत उभा राहिलो. माझा क्रमांक आला की इंटरनेट नाही, म्हणून बंद केल्याचे सांगितले. पुन्हा आता चंपाावती शाळेत गेलो तर उन्हाने त्रास सुरू झाला. आमच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. गर्दीने हाल होत आहेत.
- पंडितराव कुलकर्णी, बीड
जिल्ह्याला ५६ हजार डोस आले होते. ग्रामीण भागातील सर्वच डोस संपले आहेत. शहरांत काही ठिकाणी उपलब्ध आहेत. १८ ते ४४ वयोगटांसाठी रोज एका केंद्रावर २०० डोस दिले जात आहेत. लसीची मागणी केली आहे.
- डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड
===Photopath===
080521\08_2_bed_21_08052021_14.jpg
===Caption===
बीड शहरातील चंपावती शाळेत लसीकरणासाठी लागलेली लांबच लांब रांग.