व्यथा फार्मासिस्टच्या; रूजू अन् निवृत्तीही एकाच पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:30+5:302021-09-25T04:36:30+5:30
बीड : रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असलेल्या फार्मासिस्टच्या व्यथा मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनासारख्या महामारीत त्यांनी जीव धोक्यात घालून ...
बीड : रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असलेल्या फार्मासिस्टच्या व्यथा मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनासारख्या महामारीत त्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. परंतु कोठेच दखल घेतली नाही. तरीही हे लोक शांतच राहिले. पण गंभीर म्हणजे त्यांना पदोन्नती देण्याबाबत कसलीच प्रक्रिया नाही, ही खंत आहे. ज्या पदावर रूजू होतात, त्याच पदावर त्यांना निवृत्तही व्हावे लागते. शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या लोकांना पदोन्नती दिली जाते. परंतु या संवर्गात पदोन्नतीच दिली जात नाही, हे दुर्दैव आहे. २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट डे म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने 'लोकमत'ने घेतलेला आढावा.
---
काय आहेत त्यांच्या मागण्या
आर. आर. (रिक्वायरमेंट रूल्स) अपडेट करावेत
पदोन्नती देण्याबाबत शासन स्तरावरून पदनिर्मिती करून कार्यवाही करावी
केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी
कोरोनाकाळात काम केल्याने आरोग्य विभागातील सर्वांनाच एक महिन्याचे जादा वेतन द्यावे
फार्मासिस्टची पदे वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाेन करावीत
---
या कामांची दखलच नाही
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांना सेवा देणे (माणुसकीने)
शिपायापासून ते सुरक्षारक्षकांपर्यंतची कामे करणे
औषधी देण्यासह माहिती अपडेट ठेवणे, ऑनलाईन करणे
कुष्टरोग, क्षयरोग्यांचे समुपदेशन करून त्यांना धीर देणे
२४ तास सेवा देणे
---
बदली सहकारी नसल्याने २४ तास सेवा
प्राथमिक आरोग्य केंद्रात फार्मासिस्टचे एकच पद आहे. काही कामानिमित्त अथवा कारणास्तव तो रजेवर गेल्यावर शिपाई, परिचारिकाच औषधी देत असल्याची उदाहरणे आहेत. महिला फार्मासिस्ट तर सहा महिन्यांसाठी प्रसुती रजेवर गेल्यास आरोग्य केंद्र रामभरोसेच असते. इतरांकडे पदभार दिला तरी ओपीडी वेळ एकच असल्याने औषधी कशी देणार, असा प्रश्न असतो. त्यामुळे २४ तास सेवेत राहावे लागते.
---
आमच्या कामाची दखल कोणी घेत नाही आणि मागण्यांकडेही लक्ष दिले जात नाही ही खंत आहे. आम्हाला औषधनिर्माण अधिकारी असे संबोधले जाते. प्रत्यक्षात काहीच अधिकार नाहीत. औषधनिर्माता म्हणले तरी बस झाले. पदे वाढविण्यासह मागण्या पूर्ण कराव्यात.
योगेश जोशी, बीड
--
बदली सहकारी नसणे, ही खूप मोठी अडचण आहे. पदे वाढविण्याची मागणी आहे. तसेच रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून २४ तास काम करतात. रात्री अपरात्री फार्मासिस्ट काम करतात. परंतु वेतन अगदी तूटपुंजे दिले जाते. आमच्या व्यथांची दखल घ्यावी, एवढीच विनंती आहे. प्रिया शाईवाले, बीड
240921\24_2_bed_4_24092021_14.jpeg~240921\24_2_bed_3_24092021_14.jpeg
प्रिया शाईवाले~योगेश जोशी