गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत; शेतातून घरी परतत असताना वीज कोसळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 02:04 PM2021-05-03T14:04:10+5:302021-05-03T14:07:41+5:30
बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा फटका
बीड : जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दोन विविध ठिकाणी वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. तर सहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. केज तालुक्यात दोन दिवसात चार ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली.
बीड तालुक्यातील नेकनूरच्या लोखंडे वस्तीवरील राधाबाई दीपक लोखंडे (२०) ही महिला दुपारी शेतात काम करीत होती. पाऊस सुरू झाल्याने ती घराकडे परतत असताना तिच्यावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राधाबाईच्या समोर असणाऱ्या त्यांच्या सासू जखमी झाल्या. मयत राधाबाई या आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत.
दुसरी घटना केज तालुक्यात पिटीघाट येथे घडली. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास येथील महिला गीताबाई जगन्नाथ ठोंबरे (वय ४५) या शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आष्टी, अंबाजोगाई, धारूर परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.
मंदिर, घरावर वीज कोसळली
केज तालुक्यात शनिवारी बेंगळवाडी येथील एका मंदिरावर वीज पडून मंदिराचे नुकसान झाले. तर दुपारी चंदन सावरगाव येथील तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर वीज पडली, परंतु घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. यामुळे घराला आग लागून येथे ठेवलेले सोयाबीन, हरभरा, गहू धान्य, पाईप, मोटारसायकलसह कडबा गंजी खाक झाली. यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे पूर्ण वस्तीलाच आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाने आग शमविल्याने नुकसान टळले.
पाच जनावरे ठार
नेकनूरजवळील सानपवाडी शिवारात रविवारी वीज पडून बाबासाहेब नामदेव गित्ते यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले तर अंबाजोगाई शहरातील मेंढी फार्मजवळ चांदमारी परिसरात वीज कोसळून आजीम खान यांच्या मालकीच्या दोन गायी आणि एक शेळी दगावल्याची घटना घडली.