पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:18+5:302021-04-29T04:25:18+5:30
माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, ...
माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, या टेंडर धारकाकडून नागरिकांना कधी हिरवे, कधी पिवळे, तर गाळयुक्त पाणी दिले जात असताना याकडे ना नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे नगरपालिकेला दरमहा मोठा फटका बसू लागला आहे.
नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या काळात माजलगाव शहर व अकरा पुनर्वसित गावांना माजलगाव धरणाच्या बाजूला असलेल्या जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धिकरण केंद्रावरील जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्तीच्या अभावामुळे या गावच्या नागरिकांना मागील दोन वर्षांपासून विना फिल्टर केलेले व अशुद्ध पाणी जे की डायरेक्ट धरणातून येते, तेच पाणी नगरपालिकेद्वारा पाजले जात असे. परंतु नगरपालिकेत सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन उपाध्यक्षा सुमनबाई मुंडे यांच्याकडे नगराध्यक्षांचा पदभार दिल्यानंतर त्यांनी प्रथम हे जलशुद्धिकरण केंद्र स्वच्छ व दुरुस्त करून या गावांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी टेंडर काढले होते. यानंतर संबंधित ठेकेदाराने सुरुवातीला जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्त केले व त्यानंतर मिनरल वाॅटरच्या बाॅटलप्रमाणे या ठिकाणाहून पाणी मिळेल असे या ठेकेदाराकडून सांगितले जात होते.
सुरुवातीला ४-८ दिवस पाण्याचा दर्जा चांगला पाहावयास मिळू लागला. परंतु, काही दिवसांतच या पाण्यात कधी तुरटी, तर कधी ब्लिचिंग न टाकताच पाणी सोडले जात असल्याने पाणी अशुद्ध होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
यानंतर अनेक वेळा तर पाणीच फिल्टर न करताच तसेच सोडण्यात येत असल्याचे या फिल्टरवरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे कधी हिरवे, तर कधी पिवळ्या रंगाचे पाणी नळाद्वारे येत आहे. तर या येत असलेल्या पाण्यात एका हंड्यात ५० ग्रॅमपेक्षा जास्त गाळ खाली साचलेला दिसून येत आहे.
टेंडरचालकास नगरपालिकेकडुन या बदल्यात दरमहा साडेसात लाख रुपये दिले जात आहेत. येथील नगरपालिका दरमहा मोठ्या प्रमाणावर खर्च करत असताना मात्र नागरिकांना कशाही रंगातील पाणी पिण्याची वेळ येत असल्याने येथील नागरिकांना पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाये उस जैसा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मुख्याधिकारी म्हणतात, टेंडर बंद करू
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना या पाण्याबाबत अनेक वेळा विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणतात, याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत असल्याने हे टेंडर बंद करू. असेच अनेक वेळा उत्तर मिळताना दिसते व याबाबत ते फक्त फोनवरच माहिती घेतात. त्यांनी कधीही या जलशुद्धिकरण केंद्रावर जाऊन पाहणीच केलेली नाही. यामुळे या पाण्याबद्दल त्यांना कसलीच माहिती नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून वारंवार केला जातो.
धरणाच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने धरणाच्या कडेच्या भागात असलेला गाळ पाण्यासोबत येत असल्याने पाणी खराब येत आहे. आता हा गाळ हटविण्यात आला असून, आता पुन्हा शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे.
शेख मंजूर, नगराध्यक्ष माजलगाव न. प.