आनंदगाव परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:44+5:302021-06-30T04:21:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका शेतकऱ्याने बिबट्याच्या मादीसह तिचे दोन बछडे सोमवारी रात्री एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका शेतकऱ्याने बिबट्याच्या मादीसह तिचे दोन बछडे सोमवारी रात्री एका पाणवठ्यावर पाहिले. हे बिबटे पाणी पिण्यासाठी येथे आले होते. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
येथील शेतकरी संभाजी लांडगे यांच्या शेतातील एक गाय मृतावस्थेत आढळून आली होती. सुरुवातीला कुत्र्याने गायीची शिकार केल्याचा संशय ग्रामस्थांना आला. ती गाय ग्रामस्थांनी शेतात पुरली.
त्यानंतर सोमवारी रात्री अशोक डाके या शेतकऱ्यास बिबट्याची मादी व बछडे आढळून आले. त्यांनी हे पाणवठ्यावर पाणी पिताना पाहिले. दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाकडे व माजलगाव तहसील कार्यालयास या प्रकाराची माहिती दिली आहे.
गेल्या सात वर्षांपूर्वी येथील गिरीश थावरे यांच्या शेतात एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. त्यानंतर आता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत घबराटीने वातावरण आहे. रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर पडत नाहीत. वनविभागाचे या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
...
आनंदगाव ग्रामस्थांनी बिबट्याच्या वास्तव्याची माहिती दिली आहे. वनविभागाच्यावतीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव.