माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका: पंकजा मुंडे; अमित शाह यांच्याशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 05:52 AM2023-06-04T05:52:01+5:302023-06-04T05:55:24+5:30
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, परळी (जि. बीड) : मी कोणाच्या खांद्यावर नव्हे तर काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या खांद्याची तेवढी रुंदी आहे. परंतु, त्यावर कोणालाही विसावू देणार नाही. राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणेच घेईल. लवकरच आपले नेते अमित शहा यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्तपणे चर्चा करणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्यभरातून गोपीनाथ गडावर आलेल्या कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे.. अमर रहे.. गोपीनाथ मुंडे अमर रहे’, ‘संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे...’ अशा घोषणा दिल्या.
परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादनासाठी राज्यभरातील समर्थकांनी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी समाधी स्थळाचे दर्शन घेत अभिवादन केले.
मुंडे-खडसे यांची बंद दरवाजाआड चर्चा
- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची परळीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात काही मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा झाली.
- खडसे म्हणाले, ही भेट कौटुंबिक भेट आहे. राजकारणाशी संबंध नाही. भाजपने संधिसाधू लोकांना जवळ केले आणि माझ्यासारख्या व पंकजा मुंडे यांना दूर केले.
- बहुजन समाजापर्यंत भाजप नेण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे. सध्या भाजपने सध्या जुन्या लोकांना मागे करून त्यांचा मानसिक छळ सुरू केला आहे. नव्याने आलेल्यांचे भाजपमध्ये योगदान शून्य आहे. परंतु पंकजा मुंडे यांची सध्या भाजपमध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना झाल्याचेही खडसे म्हणाले.
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी त्या छातीठोकपणे घेते. मी माझ्या नेत्यांना भेटणार असून, त्यांच्याशी मुक्त चर्चा करणार आहे. माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, हे विचारणार आहे. स्पष्टता आल्याशिवाय पुढे चालता येणार नाही. - पंकजा मुंडे, माजी मंत्री.