पंकजांचा आता ‘माधवंबंरा’ मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:33 AM2019-12-12T03:33:23+5:302019-12-12T03:33:55+5:30

मेळाव्याच्या निमित्ताने त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

Pankaja Munde has organized a rally today at Gopinath Gad on the anniversary of Gopinath Munde. | पंकजांचा आता ‘माधवंबंरा’ मार्ग?

पंकजांचा आता ‘माधवंबंरा’ मार्ग?

googlenewsNext

बीड : भाजपवर नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र करत ‘माधव’चा प्रयोग केला होता. भाजपवर दबाव आणण्यासाठी पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपुत समाजांना जोडत ‘माधवबरा’चा प्रयोग करणार असल्याची चर्चा आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज गुरूवारी पंकजा मुंडे यांनी मेळवा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. माळी, धनगर, वंजारा असे जातीय घटक एकत्र करुन गोपीनाथराव मुंडे यांनी जिल्ह्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी संघटन मजबूत केले होते. या ‘पॅटर्न’ला निवडणुकीत जसजसे यश मिळत गेले, तसतसे ओबीसी समाजातील इतर घटकांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न मुंडे यांनी केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा यांनी ओबीसी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न राज्यभर केला.

या तीन घटकांना जोडूनच बंजारा आणि राजपूत समाजालाही उद्याच्या मेळाव्यात जोडून ‘माधवंबंरा’ हा विस्तारीत पॅटर्न राबविण्यात येणार असल्याच्या पोस्ट पंकजा मुंडे यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावरुन फिरविण्यात येत आहेत. ओबीसी संघटन मजबूत करुन अप्रत्यक्षपणे भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न या पोस्टद्वारे पहावयास मिळत आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या पोस्ट टाकून त्यांच्या चाहत्यांनी आपला रोषही व्यक्त केला होता. गोपीनाथरावांच्या निधनानंतर परळीत वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरात गोपीनाथगडाची निर्मिती करण्यात आली. या गडावर गोपीनाथरावांची समाधी आहे. दरवर्षी पुण्यतिथी आणि जयंतीला याठिकाणी त्यांच्या चाहत्यांचा मेळावा होत असतो. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यास वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क केला असता ‘उद्यापर्यंत वाट पहा, मेळाव्यातच भूमिका स्पष्ट करेन’, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Pankaja Munde has organized a rally today at Gopinath Gad on the anniversary of Gopinath Munde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.