सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होतंय; पण माजी खासदार प्रीतम मुंडेंचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:31 PM2024-07-03T15:31:08+5:302024-07-03T15:52:41+5:30

विधानसभा, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी

Pankaja Munde is being rehabilitated; But what about Pritam Munde? | सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होतंय; पण माजी खासदार प्रीतम मुंडेंचे काय?

सलग दोन पराभवानंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होतंय; पण माजी खासदार प्रीतम मुंडेंचे काय?

बीड : विधानसभा आणि लोकसभा अशा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पराभवानंतर पंकजा यांचे पुनर्वसन केले जातेय. पंकजा यांचा २०१९ पासून सुरू असलेला राजकीय वनवासही यानिमित्ताने थांबू शकतो. परंतु दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांचे काय? असा सवाल समर्थकांमधून विचारला जात आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा त्यांचे भाऊ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्या फारशा सक्रिय नव्हत्या. त्या जरी आमदार नसल्या तरी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या रूपाने खासदार घरात होते. आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळून त्या हॅट् ट्रिक साधणार, असे सांगितले जात होते. पंकजा यांनीही आपण बहीण प्रीतम यांच्या जागेवर अतिक्रमण करणार नसल्याचे अनेकदा सांगितले; परंतु ऐनवेळी पक्षाने डॉ. प्रीतम यांचे तिकीट कापून त्यांचीच मोठी बहीण पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे उभा होते. यावेळी जातीय राजकारण झाल्याने पंकजा मुंडे यांना फटका बसला आणि अवघ्या साडेसहा हजार मतांनी पंकजा यांचा निसटता पराभव झाला. विधानसभा पाठोपाठ लोकसभेतही पंकजा यांचा पराभव झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांमधून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपून त्यांचे पुनर्वसन भाजपकडून केले जात आहे. यामुळे भाजप आणि समर्थकांमधून जल्लोष केला जात आहे.

मागितले १०० दिवस अन् १५ दिवसांतच उमेदवारी
पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आष्टी, शिरूर आदी ठिकाणी समर्थकांनी जीवनयात्रा संपविली होती. त्यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे यांनी १६ जून रोजी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आत्महत्या करू नका. पुढील १०० दिवस द्या, सर्व पलटून टाकू, असे विधान केले होते; परंतु अवघ्या १५ दिवसांतच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रीतमला विस्थापित होऊ देणार नाही
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे या देखील सोबत होत्या. प्रीतमला मी विस्थापित होऊ देणार नाही. लवकरच तिचेही पुनर्वसन करेल, असा शब्द पंकजा यांनी दिला होता. परंतु लोकसभेत स्वत: पंकजा यांचाच पराभव झाल्याने त्याच विस्थापित झाल्याची चर्चा होती. परंतु समर्थकांची मागणी आणि ओबीसी नेत्या म्हणून राज्यभरात असलेली ओळख पाहता पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे या आमदार झाल्यावर त्या बहीण डॉ. प्रीतम यांचे पुनर्वसन करू शकतात, अशी चर्चा आहे.

धनंजय मुंडेंचा मार्ग मोकळा
राज्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांच्यात युती आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे सध्या युतीत आहेत. लोकसभेत पराभव झाल्याने त्या परळीतून विधानसभा लढवणार, अशी चर्चा होती. परंतु भाजपने पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती राहिली तर धनंजय मुंडे हेच युतीचे परळीतून उमेदवार असू शकतात.

Web Title: Pankaja Munde is being rehabilitated; But what about Pritam Munde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.