'अकबर रोडवरून जाताना आक्रोश करावासा वाटतो', गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींने पंकजा भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:48 PM2022-12-12T13:48:34+5:302022-12-12T13:50:10+5:30
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे.
परळी ( बीड) : दिल्ली येथील अकबर रोडवरून जाताना लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते, आक्रोश करावासा वाटतो पण त्यांनी दिलेल्या रडायचे नाही लढायचे या शिकवणीमुळे मी पुढे जाते, अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर भावना व्यक्त केल्या.
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन केले होते. तसेच राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल गोपीनाथ गडावर अर्ध्या तासाचं मौन बाळगण्यात आले. राज्यातील जवळपास साडेपाचशे ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी मौन बाळगले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. दिल्लीत अकबर रोडवरून जाताना वडिलांच्या आठवणीत थांबावे वाटते, आक्रोश करावा वाटतो. शेवटच्या काळात त्यांची काय अवस्था असेल याचा विचार करून मनसुन्न होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली. त्यामुळे दु:ख आवरून माईक हातात घ्यावा लागला. त्यानंतर रडायचे नाही लढायचे ही मुंडे यांची शिकवणी अंगिकारली.
...याचा मला राग येतो
आतापर्यंत कधीच अभद्र बोलले नाही कोणा विषयी नाही. शत्रू विषयी नाही. मला खूप घाबरतात सगळे, दरारा आहे. प्रेम करता म्हणून लोक तत्व मोडीत काढतात तेव्हा मला राग येतो. मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाणार नाही. मला जे मिळवायाचं ते मी मिळवलं. मला जिथे जायचं तिथे तुम्ही या, हे मी राजकारणात मिळवलं. मी थकणार नाही. मी थांबणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही, मी ऊतणार नाही. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.
हा सुद्धा महापुरुषांचा अवमान
महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन बोलायचं असतं. जर एखादा व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलतो, पण जर एखादा शब्द खाली वर झाला तर त्याची आपण वाट पाहतो, आणि त्यावरून बोभाटा करतो हा सुद्धा महापुरुषांचा अवमान करणेच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोहोचल्याच नाही, हा सुद्धा महापुरुषांचा अवमान आहे.