'जे जे आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:54 PM2019-02-06T14:54:03+5:302019-02-06T14:56:05+5:30
शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.
बीड - जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे आडवे येतील, त्यांना बाटलीत बंद करुन मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून दिलं जाईल, असे म्हणत पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. एक महिला जेव्हा राजकारणात येते, तेव्हा काही लोकांना बाटलीत बंद ठेवायची गरज असते, तर काहींना बाटलीतून बाहेर काढायची गरज असते. आता, एक महिला व बालकल्याणमंत्री म्हणून मला ते चांगल समजतंय, असेही पंकजा यांनी पुढे बोलताना म्हटले.
शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 400 कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. तसेच जिल्हा रुग्णालयात महिला व शिशू विभागासाठी 100 खाटांची नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड नगर पालिकेसाठी 2 टप्प्यात 495 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पंकजा यांनी आपल्या भाषणात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला, तसेच राष्ट्रवादीचे दोन गट पाडले. त्या राष्ट्रवादीत आणि या राष्ट्रवादीत. बीड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात विकास करायचा सोडून केवळ राजकारण करण्याच काम त्या राष्ट्रवादीनं केलं. बीड जिल्ह्यानं डझनभर आमदार दिले. पण, बीड जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही, साधी पंचायत समितीची इमारत उभी करण्यासाठीसुद्धा निधी मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 495 कोटी रुपयांचा निधी दिला.
पूर्वीच्या काळात फक्त कागदावर रस्ते व्हायचे. स्वत:चे बगलबच्चे पोसण्याचं काम यापूर्वी झालंय. आता, सगळ ऑनलाईन आहे, टेंडर ऑनलाईन निघतात. त्यामुळे कुणालाही पोसण्याच काम आमच्याकडून होत नाही. केवळ, लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचं काम आम्ही करतो, असेही पंकजा यांनी म्हटले. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचं स्वप्न गेल्या 70 वर्षांपासून होतं. या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. या रेल्वेसाठी 2800 कोटी रुपये मंजूर झाले.
बीड जिल्ह्यात महामार्गाच काम सुरू आहे. 6 हजार कोटींचे महामार्ग बीड जिल्ह्यात होत आहेत. तब्बल 950 किमीच्या लांबीचे हायवे बीड जिल्ह्यात होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा मोठी प्रगती करतोय, असेही पंकजा यांनी म्हटलं. दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळ असून पाऊस पडला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला, असे म्हणत पंकजा यांनी मुख्यमंत्र्याचेही कौतुक केले.