पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या, ‘ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:43 PM2024-01-29T12:43:13+5:302024-01-29T12:44:35+5:30
पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला
माजलगाव (जि. बीड) : शहरात एका विवाह सोहळ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील एकत्र आले हाेते. पंकजा यांनी जरांगे यांचे ‘आपला ओबीसीत समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे,’ अशा पद्धतीने स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
माजलगाव शहरात रविवारी संध्याकाळी विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी विविध पक्षांचे नेते आले होते. यावेळी मनोज जरांगे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथमच पंकजा मुंडे आणि जरांगे समोरासमोर आले. यामुळे त्यांच्यात कोणता संवाद होईल अशी सर्वांना उत्सुकता होती. अनेक मंत्री छगन भुजबळ वगळता इतर ओबीसी नेत्यांनी कुणबी मराठा आरक्षणावरील नव्या अध्यदेशावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे देखील राज्यातील मातब्बर ओबीसी नेत्या आहेत. यामुळे मुंडे आणि जरांगे या दोन नेत्यांची पहिली भेट कशी होणार, दोघांत काय संवाद होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
दरम्यान, लग्न सोहळ्यात एकमेकांच्या बाजूला सोफ्यावर माजी मंत्री राजेश टोपे, मराठा नेते मनोज जरांगे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिघेही संवादात रमले होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनोज जरांगे यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच होत आहे. त्यांचा शनिवारी ओबीसीमध्ये समावेश झाला असून त्यांचे ओबीसीत स्वागत आहे.’ पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर जरांगे यांनीदेखील स्मितहास्य करत दाद दिली.
सकारात्मक मार्ग मिळाला आहे
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यादेश निघताच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या , गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहताय त्या प्रवृत्तींना आपल्याला आळा घातला पाहिजे. यात संयमाची भूमिका घेण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढलाय. सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा. या अध्यादेशात मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या होत्या. त्यातील एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. यात सगेसोयरे यांची व्याख्या केली आहे. आजही लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झालेत हे म्हणायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.