पंकजा मुंडे रमल्या 'खास' दांडियात; महिल्यांच्या आग्रहास्तव धरला गाण्यावर ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 08:05 PM2022-09-30T20:05:48+5:302022-09-30T20:06:28+5:30
काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाने निर्माण झालेला वाद बाजूला सारून पंकजा मुंडे दांडियात रमल्याने त्यांच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
परळी( बीड) : येथील विद्यानगर भागात विद्यानगर सार्वजनिक दुर्गोत्सव व दांडिया उत्सव समितीने आयोजित केलेल्या खास महिलांसाठींच्या दांडिया उत्सवास गुरुवारी रात्री 9 वाजता भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी दांडियात सहभागी होत पंकजा यांनी महिलांच्या आग्रहास्तव एका मराठी गाण्यावर ठेका धरला.
शहरात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव व विविध ठिकाणी मंडळाच्या वतीने दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. वैद्यनाथ अर्बन बँकेचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते बालाजी सातपुते यांनी नवरात्र निमित्त दांडिया उत्सवाचे आयोजन केले आहे. 26 सप्टेंबर पासून दांडीया उत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शहरातील महिला व मुली उत्साहाने सहभागी होत आहेत. या ठिकाणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रात्री भेट दिली. यावेळी युवक शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे व बालाजी सातपुते यांनी त्यांचे स्वागत केले.
गाण्यावर धरला ठेका
खास महिलांसाठी आयोजित हा दांडियात पंकजा चांगल्याच रमल्या. दरम्यान, काही महिलांनी दांडियात सहभागी होण्याची त्यांना विनंती केली. शेवटी पंकजा यांनी दांडियात सहभाग घेत गाण्यावर ठेका धरला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या 'मोदी देखील मला संपवू शकत नाहीत' या विधानाने एकच खळबळ उडाली होती. यावर त्यांनी लागलीच माझ्या बोलण्याचा विपर्यास्त झाला आहे असे सांगत संपूर्ण भाषणच सोशल मीडियात शेअर केले. यावर त्यांच्या समर्थकांनी मुद्दामहून पंकजा मुंडे यांना अडचणींत आणण्यात येत असल्याची टीका झाली होती. यासर्व वातावरणास बाजूला सारत पंकजा मुंडे दांडियात रमल्याने त्यांच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.