आज मुंबईत पंकजा मुंडे यांचा बीडच्या समर्थकांसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:38 AM2021-07-14T04:38:25+5:302021-07-14T04:38:25+5:30

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याबद्दल बीड जिल्हा भाजपत पसरलेला असंतोष वाढला असून, ...

Pankaja Munde talks to Beed supporters in Mumbai today | आज मुंबईत पंकजा मुंडे यांचा बीडच्या समर्थकांसोबत संवाद

आज मुंबईत पंकजा मुंडे यांचा बीडच्या समर्थकांसोबत संवाद

Next

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याबद्दल बीड जिल्हा भाजपत पसरलेला असंतोष वाढला असून, जिल्ह्यातून जवळपास ७० जणांनी जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठवले आहेत. हे राजीनामे घेऊन भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे मंगळवारी मुंबईत पोहचणार आहेत. मुंडे भगिनींचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले असून, मंगळवारी त्यांच्याशी पंकजा मुंडे या संवाद साधतील, असे सूत्रांनी सांगितले. या संवादात पंकजा मुंडे काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राजीनामे देणाऱ्यांत पक्षाचे पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापतींचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, केजच्या आमदार नमिता मुंदडा, विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची काय भूमिका असेल? याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे. भाजपचे नेते रमेश आडसकर यांनीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांचे पुतणे आणि केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषीकेश आडसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपण सर्वांसोबत असल्याचे आडसकरांनी स्पष्ट केले.

कुठे तरी खटकतंय

२०१९च्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील भाजपत जी एकसंघता होती, ती आता दिसत नाही. आता हेच बघांना मराठा आरक्षणावर आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये मोर्चा काढला तेव्हा खासदार डॉ. प्रीतम मुंडे या रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर आमदार सुरेश धसांच्याच आष्टीत माजी आ. भीमसेन धोंडे यांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत होत्या. भाजपच्या भूमिकेप्रमाणेच आमदार धसांनी दोन दिवसांत नियोजन करून बीडमध्ये भव्य मोर्चा काढला होता. तरीही खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची या मोर्चाला असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. विशेष म्हणजे मोर्चाला गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, माजी आ. आर. टी. देशमुख यांची आवर्जून उपस्थिती होती. या मोर्चाच्या वेळी आमदार धस यांनी अगदी तोंडभरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती, तर आमदार लक्ष्मण पवार आणि फडणवीसांचे सख्ख्य जिल्हाला माहीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Pankaja Munde talks to Beed supporters in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.