पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक आडसकरांच्या हाती 'तुतारी'; माजलगावच्या उमेदवारीचा पेच सुटला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:30 PM2024-10-25T19:30:06+5:302024-10-25T19:32:31+5:30
'तुतारी'कडून रमेश आडसकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : माजलगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन दिवसांपूर्वीच फिक्स झालेले असतानाच शरद पवार पक्षाकडुन अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. यातच शुक्रवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या पक्षात मागील अल्पमताने पराभूत झालेले व पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश आडसकर यांनी तुतारी हातात घेतली. आता 'तुतारी'कडून रमेश आडसकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
मागील एक वर्षात मराठा आंदोलनामुळे माजलगाव मतदार संघ ढवळून निघाला होता. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनाबाबत एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना अपशब्द वापरले होते. कार्यकर्त्याशी बोललेली क्लिप वायरल झाल्याने मराठा युवक आक्रमक झाले होते. दरम्यान एका आंदोलनावेळी या युवकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर जाऊन त्यांचे घर पेटून दिले होते. यामुळे या ठिकाणी जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीतील देखील पहावयास मिळाला.
यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला शरद पवार गटाची उमेदवारी हवी म्हणून अनेक जणांनी बारामतीला चकरा मारून मारून आपली चप्पल शिजवली होती. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु शरद पवार गटाकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे पहिले यादीत माजलगाव मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. यातच शुक्रवारी रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
रमेश आडसकर हे गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघा बाहेरील असताना देखील केज व परळी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून रमेश आडसकर यांना माजलगावची उमेदवारी जाहीर झाली होती. नवखे असताना रमेश आडसकर यांनी चांगली फाईट दिली. त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. महायुतीमध्ये माजलगाव मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे रमेश आडसकर यांना पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची जवळीक करत आज शरद पवार गटात प्रवेश केला. मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. मात्र, आडसकर यांनी 'तुतारी' हाती घेत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जगताप यांनी घेतलेला मेळावा त्यांना भोवला
आपल्याला शरद पवार गटाचे तिकीट फिक्स असल्याचे दाखवण्यासाठी मोहन जगताप यांनी एक महिन्यापूर्वी मेळावा घेतला होता. या मेळाव्या दरम्यान जगताप यांनी मी मोक्कार आहे, मी दारू पितो यासह महिलांसमोर खालच्या पातळीची भाषा वापरली होती. याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ते शरद पवार यांच्यापर्यंत गेल्याने मोहन जगताप यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा आहे.
जगताप घेणार मनसेची उमेदवारी ?
शरद पवार गटाकडून तिकीट पक्के समजणाऱ्या मोहन जगताप यांना शरद पवार यांनी चांगलाच हाबाडा देत आडसकर यांना पक्षात प्रवेश दिला. यामुळे मोहन जगताप हे लवकरच मनसेत जाऊन त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांच्या कार्यकर्त्यातून बोले जाऊ लागले आहे.