पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:05 PM2024-06-12T19:05:16+5:302024-06-12T19:06:32+5:30
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड) - लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक एका तरूणाने गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अशी दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील युवकानेही मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवले होते.
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे (३७) हा तरूण मुंडे समर्थक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला. पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात गेला होता. मंगळवारी रात्री दरम्यान त्याने कोणाला काही एक न बोलता चिंचेवाडी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गावांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फेसबुक पोस्टनंतर गळफास...
गळफास घेण्यापुर्वी अगदी काही मिनिट अगोदर पोपट याने स्वताच्या मोबाईल वरून अलविदा... ही फेसबुक पोस्ट केल्यानंतर गळफास घेतला.
अंबाजोगाई येथील युवकानेही संपवले होते जीवन
पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने ९ जून रोजी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.