मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी!
By सोमनाथ खताळ | Published: April 30, 2024 12:10 AM2024-04-30T00:10:07+5:302024-04-30T00:10:41+5:30
तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला.
बीड/माजलगाव : लोकसभा निवडणुकीत सध्या जातीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सकाळी माजलगाव तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे त्यांची गाडी अडवत मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना घेराव घातला. आरक्षणासंदर्भात लेखी अश्वासन द्या, अशी मागणी करत जाबही विचारला. यावेळी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली.
तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी मुंडे खाली उतरून सर्व युवकांना मराठा आरक्षणाबाबत आपला असलेला पाठिंबा याबाबत समजून सांगत होत्या, परंतु युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे, असे तुम्ही बाॅंडवर लिहून द्या, असा आग्रह त्यांनी केला.
हा प्रकार गावात जाताना अर्धा तास व त्या परत येताना १५ मिनिटे घडला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली, परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेत मध्यस्थी केली. पोलिस आणि अंगरक्षकांनी त्यांना जमावातून बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.