पंकजा मुंडेंचा नव्या संघर्षाचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:55 PM2019-12-12T23:55:21+5:302019-12-12T23:56:37+5:30
‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
परळी : ‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावरून संवाद साधत आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील सर्व जातीधर्माची व्रजमूठ करुन हातात मशाल घेत सर्वसामान्य माणसांसाठी लढा देण्याची घोषणा करीत नव्या संघर्षाचा एल्गार केला.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच कार्यकर्ते व भक्तांची रीघ लागली होती. हजारो कार्यकर्त्यांनी तसेच राज्यातून आलेल्या नेते व पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठाकडे पंकजा मुंडे यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खा.डॉ. प्रीतम मुंडे, पाशा पटेल, सुजीतसिंह ठाकूर, आ. अतुल सावे, आ. मोनिका राजळे, आ. नारायण कुचे, आ.सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. मेघना बोर्डीकर, आ. नमिता मुंदडा, आ.राजेश पवार, आ. श्वेता महाले, आ. माधुरी मिसाळ, आ. आकाश फुंडकर, आ. तुषार राठोड आदींसह राज्यातील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते येत होते.
दरम्यान, बुधवारी रात्री ९ वाजता सातारा जिल्ह्यातून मुंडे प्रेमी मशाल घेऊन गोपीनाथगडावर दाखल झाले होते. त्यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उप जिल्हा रुग्णालय, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने परळी येथे दोन दिवस महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी विचारपूस केली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्म्यांचे वाटप झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध समाजोपयोगी कार्यक्रम तसेच अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.