पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ; वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू
By शिरीष शिंदे | Published: January 10, 2024 11:21 AM2024-01-10T11:21:02+5:302024-01-10T11:21:52+5:30
२०३ कोटी रुपये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने उचलले पाऊल
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे २०३ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहेत. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे मानले जात आहे.
भाजप नेत्या मुंडे यांना पक्षात सातत्याने डावलले जात असल्याचे वारंवार बोलले जात आहे. मधल्या काळात जीएसटी विभागाने वैद्यनाथ कारखान्यास १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. त्यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले. लोकसहभाग व लाेकचळवळीतून १९ कोटी रुपये देण्याची तयारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी केली होती. त्यानंतर आता वैद्यनाथ कारखान्याकडे कर्ज थकीत प्रकरण समोर आले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर लिलावाची प्रक्रिया हाती घेतली आहे.
लिलावाच्या नोटीसमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, श्रीनिवास दीक्षितुल्लू, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे, व्यंकटराव कराड, यशश्री मुंडे यांच्या नावे नोटीसमध्ये कर्जदार, जामीनदार व तारणदार म्हणून नमूद आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे २० एप्रिल २०२१ पासून थकीत असलेल्या २०३ कोटी ६९ लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याचे समजते.