पंकजाताई भगवान गडाची पायरी तर मी पायरीतला दगड: धनंजय मुंडेंची वडीलकीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:50 PM2023-04-12T15:50:59+5:302023-04-12T15:51:33+5:30
भारजवाडी येथील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांचे संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारे भाष्य
बीड: ऐश्वर्यसंपन्न स्वरूप आणि भक्ती शक्तीचा अनोखा संगम असलेल्या संत भगवान बाबांनी समाज सुधारणा केली, समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्यामुळेच आज मराठवाड्यातील ऊसतोड कामगार, शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील मुले मोठमोठे अधिकारी बनत आहेत. ग्रामीण भागातील बहुजन समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या संत भगवानबाबांची कीर्ती कन्याकुमारीपासून ते जम्मूपर्यंत गाजली. पुढेही ही कीर्ती आणि भक्तीची परंपरा अखंडित राहावी यासाठी सर्वांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन एकत्रित योगदान द्यावे, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या परंपरेतील 89 व्या नारळी सप्ताहाची आज भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी उपस्थित लाखोंच्या भाविक सागराशी आ. धनंजय मुंडे यांनी संवाद साधला.
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व आमचा संपूर्ण मुंडे परिवार भगवानगडाचा निस्सीम भक्त आहे. इथे आम्ही राजकीय नेते-पुढारी म्हणून नाही तर भक्त म्हणून येतो. भगवानगडाच्या उभारणी आणि विकासात कष्टकरी-शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या मेहनतीच्या एक-एक रुपयांपासून ते अनेकांचे योगदान आहे. गरीब आणि श्रीमंत अशी कोणतीही दरी नष्ट करून सर्वांना भक्तांच्या एकाच रांगेत बसवणारे तेजस्वी संत म्हणून आम्हाला भगवानबाबा माहीत आहेत व ते पुढच्या अनेक पिढ्यांना देखील कळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. व्यासपीठावर माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, आ. मोनिका राजळे, प्रताप ढाकणे यांसह अनेकांची उपस्थिती होती.
भक्त परंपरेत मी असो किंवा पंकजाताई असो, आम्ही इथे राजकीय विरोधक म्हणून नाही तर मुंडे कुटुंबीय व गडाचे भक्त म्हणून आलोत. या पिढीत मी कुटुंबात सर्वात मोठा असल्याने कुटुंबाच्यावतीने गडासाठी जे काही करायचे, त्याची जबाबदारी मी घेतली आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. गडाच्या भक्त परंपरेत पंकजाताई या गडाची एक पायरी तर मीही पायरीचा एक दगड आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्यातील संयमी व आपलेसे करणाऱ्या वक्तृत्वाची ओळख नव्याने करुन दिली. धनंजय मुंडे यांच्या आजच्या बोलण्यातून मनाचा मोठेपणा व वडीलकीची भावना देखील दिसून आली.