Papers Leak Maharashtra : आरोग्य विभागाचे पेपर मराठवाड्यात विकले; आतापर्यंत १७ आरोपींना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:34 AM2021-12-17T07:34:50+5:302021-12-17T07:35:30+5:30
आरोपींनी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पेपर वाटप केल्याचे तपासातून उघड
सोमनाथ खताळ
बीड : आरोग्य विभागाच्या गट ड परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत सहसंचालक महेश बोटले, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेसह १७ आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पेपर वाटप केल्याचे तपासातून उघड झाले आहे. यासाठी ५ ते ८ लाख रुपये एका विद्यार्थ्याकडून वसूल केल्याचेही सांगण्यात येत आहे. आरोपींसह पेपर वाटपाचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
आरोग्य विभागाची गट ड पदासाठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. परंतु त्याआधीच पेपर फोडल्याचे उघड झाले. यात लातूर उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा सहसंचालक महेश बोटले हे दोघेच मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले होते.
पुणे सायबर पोलिसांनी तपास करत आतापर्यंत १७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबादमधील रहिवासी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे आरोपी १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या आरोपींनी आतापर्यंत जवळपास ५० विद्यार्थ्यांना पेपर दिल्याचे तपासात उघड झाले असून, याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.