परळीत मुंडे कुटुंबांचे नाथ्रा गावात एकत्र मतदान, भाऊ- बहिणींनी मतदारांचा वाढवला उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:51 PM2024-05-13T15:51:45+5:302024-05-13T15:53:15+5:30
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. बहिणीच्या
परळी:बीड लोकसभा निवडणुकीसाठी शहर व परिसरात मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळी 11 पर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर मतदारांची रीघ तर काही मतदान केंद्रात तुरळक मतदार दिसून आले. शहर व परिसरात दुपारपर्यंत शांततेत मतदान चालू होते. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथांचे दर्शन घेऊन बीड लोकसभा निवडणूकीतील भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी आज नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी यशश्री मुंडे होत्या. यांनी प्रथम सकाळी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नाथ्रा येथे ग्राम दैवत पापनाशेश्वराचे दर्शन घेऊन सकाळी ११.०५ वा. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणूकीतही तेच दिसले. मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जनतेचा आशीर्वाद मला असल्याने विजय निश्चित आहे.. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही नाथ्रा येथे आई रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.