परप्रांतीय मजुराचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:55 AM2019-05-27T00:55:56+5:302019-05-27T00:56:19+5:30
विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय मजुराचा पाय घसरुन पडल्याने खडकावर आदळून मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय मजुराचा पाय घसरुन पडल्याने खडकावर आदळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी शिरूर तालुक्यातील वारणी शिवारात घडली.
सहेजाद मोहम्मद हनीफ मन्सुरी (३२, रा. कोटीया सहापुरा जि. भिलवडा, राजस्थान) असे मयताचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात राजस्थानाती काही कुटुंबे शिरुर तालुक्यात स्थलांतरित झालेले आहेत. सहेजाद मोहम्मद हा स्वयंपाकी म्हणून काम करत असे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तो पाणी आणण्यासाठी वारणी शिवारातील एका विहिरीवर गेला. यावेळी पाय घसरुन तो विहिरीत कोसळला. खडकावर आदळल्याने त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याचा मामेभाऊ हनीफ मोहम्मद बाबूद्दीन मन्सुरी यांच्या खबरीवरुन रुग्णालय चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोहेकॉ पी.के. ससाणे यांनी दिली.
स्फोटात जखमी होऊन मृत्यू ?
विहिरीतील खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा स्फोट करण्यात आला होता. यात जखमी होऊन सहेजादचा मृत्यू झाल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली.
मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृतरित्या कागदावर काहीच आलेले नव्हते. पोलिसांकडून मात्र, याला दुजोरा मिळाला आहे.
हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चाही जिल्हा रूग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली.