फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग 

By राजन मगरुळकर | Published: July 15, 2023 06:04 PM2023-07-15T18:04:45+5:302023-07-15T18:05:39+5:30

स्क्वाड्रन लीडर सुशील शिंदे याची अभिमानास्पद कामगिरी

Parbhani's Bhoomiputra in France's Bastille Day Parade; Participating in Raphael's Spectacular Drill | फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग 

फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग 

googlenewsNext

परभणी :फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी १४ जुलैला झालेल्या लष्करी कवायतीमध्ये राफेल विमानांचे वैमानिक म्हणून महाराष्ट्रातील परभणीतील एअर फोर्समधील स्क्वाड्रन लीडर सुशील शिंदे यांचा समावेश होता. बॅस्टील डे (परेड) सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादर केलेल्या राफेलच्या कवायतीमध्ये परभणीचा भूमिपुत्र सहभागी होता, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी बॅस्टील डे निमित्त आयोजित लष्करी कवायतीत राफेल विमानांचे उड्डाण झाले. यावेळी लष्करी कवायतीमध्ये भारतीय राफेल विमानांचा आवर्जून समावेश होता. कार्यक्रमास पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत उपस्थित होते. यात स्क्वाड्रन लीडर सुशील शिंदे हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून इंडियन एअर फोर्समध्ये ते पायलट आहेत. परेडमध्ये फ्लायपास्टमध्ये पॅरिसच्या स्कायलाइन ओलांडणाऱ्या राफेल लढाऊ विमानांच्या भारतीय हवाई दलाचा तो भाग होता. ही बाब राज्यासह जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरली आहे.

फायटर पायलट ते स्क्वाड्रन लीडर
पायलट सुशील शंकर शिंदे यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९८९ मध्ये परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे झाला. त्यांचे आजोबा हे पूर्णेत रेल्वेमध्ये कार्यरत असल्याने गेल्या ६० वर्षांपासून शिंदे कुटुंबीय पूर्णेतच वास्तव्यास होते. सुशील यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्णा रेल्वे हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी सातारा सैनिकी स्कूलमध्ये सहावीत प्रवेश घेत बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी परीक्षेतून नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, पुणे येथे प्रवेश घेत तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांची हैद्राबाद एअर फोर्स अकॅडमीत एक वर्षासाठी निवड झाली. २०११ मध्ये आर्मी ऑफिसर म्हणून ते नियुक्त झाले. यानंतर कर्नाटकातील बिदर येथे फायटर पायलट म्हणून त्यांची निवड झाली. सन २०२० पर्यंत येथे सेवा बजावली. प्रशिक्षणात जॅग्वारचे वैमानिक तसेच अन्य प्रकारची विमानांचा अनुभव घेतला. याच प्रशिक्षणानंतर भारत सरकारने त्यांना दहा महिन्यासाठी फ्रान्समध्ये पाठविले. आता ते स्क्वाड्रन लीडर रँक अधिकारी म्हणून एअर फोर्समध्ये कार्यरत आहेत.

बहिण, भावजी सुद्धा हवाई दलात
सुशील यांची बहीण सुष्मा या सुद्धा एअर फोर्समध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तसेच सुष्मा यांचे पती एअर फोर्समध्ये कार्यरत आहेत. सुशील यांचे वडील शंकर शिंदे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत होते. सुशील यांचे सन २०२२ मध्ये माधुरी यांच्याशी लग्न झाले. सुशील यांची आई सुनीता यांचाही मुला-मुलींच्या जडणघडणीमध्ये मोलाचा सहभाग आहे.

जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी
पायलट सुशील, वडील शंकर शिंदे यांच्या पूर्णेतील अनेक वर्षाच्या वास्तव्यामुळे अनेकांशी चांगले संबंध आहेत. सुशील यांची ही अभिमानास्पद कामगिरी समोर येताच पूर्णेतील अनेकांनी अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक केले. यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नामवंत फायटर पायलटमध्ये गणना
लहानपणापासूनच सुशील व सुष्मा यांना भारतीय सैन्य दलाचे आकर्षण होते. सातारा मिलिटरी स्कूलमध्ये शिकताना त्याने फायटर पायलट होण्याचे स्वप्न उरी बाळगत ते पूर्ण केले. परंतू, आज जगातील नामवंत फायटर पायलटमध्ये त्याची गणना आहे, आमचे जीवन सार्थकी झाले. त्याची प्रात्यक्षिके पाहताना कौतुक आणि अभिमान वाटतो. पण, त्याच वेळेला मायबापाच्या काळजाचा ठोका चुकतो.
- शंकर उर्फ सुनील शिंदे, वडील.

Web Title: Parbhani's Bhoomiputra in France's Bastille Day Parade; Participating in Raphael's Spectacular Drill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.