परळीच्या महिलेचा पुण्यात ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:44 PM2019-02-04T23:44:18+5:302019-02-04T23:44:52+5:30
परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
बीड : परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ज्या पुरुषांसोबत तिचे अनैतिक संबंध होते त्याच्या पत्नीनेच माहेरच्या लोकांच्या मदतीने तिचा काटा काढला.
मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील विवाहित महिला शांताबाई (नाव बदलेले आहे) ही पती आणि भावासह पुण्यातील वाघोली भागात गवंडी कामानिमित्त गेली होती. याच कामावर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील जनार्धन उर्फ जनाजी ढगेकर आणि त्याची पत्नी मैनाबाई ढगेकर हे देखील गवंडी कामानिमित्त वास्तव्यास होते. हे सर्वजण एकाच ठिकाणी राहत होते. या ठिकाणी शांताबाई आणि जनार्दन यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. परिणामी, जनार्दन आणि पत्नी मैनाबाई यांच्यात खटके उडू लागले. जनार्दन मैनाबाईचा छळ करू लागला. त्यामुळे त्रस्त मैनाबाईने ३ मे रोजी तिचा भाऊ संदीप सिदबा काळेल आणि अर्जुन आमोगसिद शेळके (दोघेही रा. हराळवाडी, ता. मोहळ, जि. सोलापूर) यांना फोन करून शांताबाईमुळे माझा संसार मोडत असल्याचे गाºहाणे मांडले. तुम्ही लवकर वाघोलीला या, मला खूप त्रास होत आहे, असेही तिने सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या संदीप आणि अर्जुन यांनी लागलीच दुचाकीवरून (एमएच १४ - २१५०) वाघोली गाठले. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता त्यांनी शांताबाईला भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून अर्धा किमी अंतरावर नेले. तिथे गाडीवरून खाली उतरवून तिला मारहाण करत तिचे नाक आणि तोंड दाबले. त्यांनतर तिला खाली पाडून डोक्यात दगड घालून तिला ठार मारले. शांताबाईचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर तिथेच एका खड्ड्यात तिचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर या घटनेबाबत मैनाबाई, संदीप आणि अर्जुन यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, बहिणीचे काहीतरी बरेवाईट झाले असावा, या संशयाने शांताबाईच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आणि तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
दरम्यान, संदीप, अर्जुन आणि मैनाबाई या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, तिन्ही आरोपींनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड आणि संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, अर्जुन राठोड यांनी या किचकट प्रकरणाचा उलगडा केला. सहाय्यक फौजदार कुरेवाड, पोलीस कर्मचारी लाला बडे, दत्ता गीते यांनी त्यांना मदत केली. बीड आणि पुणे पोलिसांचा समन्वय महत्त्वाचा ठरला.
वरिष्ठांची मोलाची मदत
तपासादरम्यान पुणे, सोलापूर येथे अनेक चकरा झाल्या. काही वेळेस हद्दीचाही प्रश्न निर्माण झाला. परंतु, दोन्ही जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय राखत पूर्ण मदत केल्यामुळे आणि संभाजीनगर ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या सहकायार्मुळे खुनाचा छडा लागू शकला.
- रमेश जाधवर, पोलीस उपनिरीक्षक,
संभाजीनगर पोलीस ठाणे