आई-वडील ऊसतोडीसाठी कारखान्यावर; सैन्यदलात भरती झालेल्या मुलाची गावात जंगी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:36+5:302021-02-05T08:20:36+5:30
कुसळंब : आई-वडील पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी घाम गाळत असताना त्यांच्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास आणि मेहनत करून सैन्यदलात ...
कुसळंब : आई-वडील पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी घाम गाळत असताना त्यांच्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास आणि मेहनत करून सैन्यदलात सहभागी होण्याचा मान मिळविला. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांच्या मुलाची गावभर सवाद्य जंगी मिरवणूक काढत पालकत्वाचा आशीर्वाद दिला.
बीड-कल्याण महामार्गावर खडकवाडी येथील तरुण निलेश रामचंद्र दहिफळे भारतीय सैन्यदलात नुकताच रुजू होण्यासाठी रवाना होत असताना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला व खडकवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व नियम पाळून या युवकाची सवाद्य मिरवणूक काढून ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथांचा आशीर्वाद घेऊन हनुमंतांच्या आशीर्वादासाठी मंदिरासमोर एकत्र झाले.
ग्रामदैवत हनुमानाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सैन्यदलातील अप्पासाहेब जायभाये आणि रामकृष्ण सानप व ज्येष्ठ मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते निलेशचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील सर्व जाती, धर्म, पंथ व महिला मंडळींनी या गरीब होतकरू तरुणाचे औक्षण करून स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक रामदास साबळे यांनी केले. प्रा. एस.पी. जगताप यांनी गावातील तरुणांना राष्ट्रप्रेमासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रा. प्रदीप सानप, विनायक सानप, प्रयागाबाई लोंढे, मंदा पोपट सानप आदींसह नामदेव सानप तसेच मान्यवर ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. शेवटी प्रा. सुनील दहिफळे यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, खडकवाडीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रा. संजय सानप यांनी सैन्यदलात भरती झालेल्या निलेशला राष्ट्रकार्यासाठी शुभेच्छा देत निरोप दिला.
औक्षणप्रसंगी महिलांना अश्रू अनावर
सैन्यदलात भरती झालेल्या निलेशचे आई-वडील पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी कारखान्यावर आहेत. यावेळी त्यांना उपस्थित राहता आले नाही. तर, इकडे गावकऱ्यांनी निलेशची गावात सवाद्य जाहीर मिरवणूक काढली. यथोचित सन्मान केला. हनुमान मंदिरासमोर तमाम महिला-भगिनींनी निलेशचे औक्षण केले; याप्रसंगी सद्गदित होत महिलांना अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी वातावरण अत्यंत भावुक झाले होते.
'यापुढे प्रत्येक यश मिळवणाऱ्या तरुणाचा असा सन्मान होणार!' खडकवाडी भौगोलिक क्षेत्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये असल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यावर मात करीत परिश्रमाच्या जोरावर यापुढे यश मिळणाऱ्या प्रत्येक तरुणाचा याच पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढून सन्मान करण्यात येईल, जेणेकरून इतर युवकांना प्रेरणा मिळेल. - प्रा. संजय सानप, माजी सरपंच, खडकवाडी