आई-वडील शेतात मजुरी करायचे, लहानगा अविनाश धावण्यात दंग असायचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:39 AM2023-10-02T04:39:20+5:302023-10-02T04:39:43+5:30
आशियाई स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावणाऱ्या बीडच्या अविनाश साबळेची यशोगाथा
नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : आशियाई क्रीडा स्पर्धेत आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील अविनाश साबळे याने स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले. मांडव्याचं अस्सल सोनं चीनमध्ये चमकलं, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.
आष्टीपासून जवळच असलेल्या १६०० लोकवस्तीच्या मांडवा येथील कष्टकरी कुटुंबात अविनाशचा जन्म झाला. वडील मुकुंद आणि आई वैशाली उदरनिर्वाहासाठी कधी ऊस तोडणीला जायचे, तर कधी वीटभट्टीवर काबाडकष्ट करायचे. सोबत जाणारा अविनाश तेव्हा कामाच्या ठिकाणी खेळत असे. यातूनच त्याला धावण्याची आवड निर्माण झाली.
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून सराव
वयाच्या सहाव्या वर्षांपासून अविनाश सराव करीत होता. कडा येथील अमोलक विद्यालयात शिक्षणानंतर त्याने छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेतले. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन त्याने मैदानी खेळाला चॅलेंज केले. शेरी-मांडवा रोडवर तो धावण्याचा सराव करीत राहिला. त्यानंतर अविनाश भारतीय सैन्य दलात देशसेवेसाठी सामील झाला, परंतु धावण्याच्या सरावात सातत्य ठेवले.
लई काबाडकष्टातून त्यानं नाव कमावलं आहे. आमचं स्वप्न पूर्ण केलंय. भविष्यात आणखी नाव मोठं करावं. इतर मुलांनीदेखील त्याच्या सारखं नाव करावं.
- वैशाली साबळे, अविनाशची आई
दादाच्या कामगिरीचा अभिमान अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर व आई-वडिलांच्या आशीर्वादाने मोठा भाऊ गावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवतोय याचा अभिमान आहे.
- योगेश साबळे, लहान भाऊ
रविवार भारतासाठी ‘पदक’वार; पटकावली तब्बल १५ पदके
हांगझोउ : महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेज प्रकारात शानदार कामगिरी करताना १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. स्टीपलचेजमध्ये आशियाई सुवर्ण पटकावणारा अविनाश पहिला भारतीय पुरुष ठरला. भारताने रविवारी तीन सुवर्णपदकांसह एकूण १५ पदके पटकावली. तेजिंदरपाल सिंह तूरने गोळाफेकमध्ये, तर नेमबाजीत भारताच्या पुरुष संघाने ट्रॅप प्रकारात सुवर्ण पटकावले.
अशी कामगिरी
विक्रमवीर अविनाशने ८ मिनिटे १९.५० सेकंद वेळ नोंदवताना कामगिरी केली. यासह अविनाशने २०१८ रोजी इराणच्या हुसैन केहानीने नोंदविला. ८ मिनिटे २२.१९ सेकंदांचा आशियाई विक्रमही मोडला. २०१० मध्ये आशियाई स्पर्धेत सुधा सिंगने तीन हजार स्टीपलचेज शर्यतीत सुवर्ण जिंकले होते.
असे आहेत पदकविजेते
पृथ्वीराज तोडइमान, कायनन चेनाई, जोरावर सिंह संधू (नेमबाजी पुरुष ट्रॅप संघ, सुवर्ण पदक)
मनीषा कीर, प्रीति रझाक, राजेश्वरी कुमारी (नेमबाजी, महिला ट्रॅप संघ, रौप्य पदक)
लक्ष्य सेन, एस. रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, किदाम्बी श्रीकांत, कपिला ध्रुव, केपी साई प्रतीक, मिथुन मंजूनाथ (पुरुष बॅडमिंटन संघ, रौप्य पदक)