अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांवर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:30 AM2021-02-14T04:30:46+5:302021-02-14T04:30:46+5:30
गढी : जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे. रस्त्यावर चालत असताना सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. १८ वर्षांखालील ...
गढी : जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे. रस्त्यावर चालत असताना सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. १८ वर्षांखालील मुलाने वाहन किंवा दुचाकी चालवू नये, तो कायद्यानुसार गुन्हा आहे. त्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही अडकला, तर तो गुन्हा तुमच्यावर न लावता तुमच्या पालकांवर लावला जाईल, याची सर्वांनी खरबदारी घ्यावी व वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे प्रतिपादन महामार्ग पोलीस शाखेचे स.पो.नि. प्रवीणकुमार बांगर यांनी केले.
जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, गढी येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. ११ रोजी रस्तासुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव राठोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. प्रवीणकुमार बांगर, उपप्राचार्य आर. एस. सानप, पर्यवेक्षक के. एन. गायकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी बांगर यांनी शाळेतील सर्व मुलांना रस्त्याच्या नियमांची माहिती दिली, तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य वसंतराव राठोड यांनी मुलांना मार्गदर्शन करून रस्त्याने चालत असताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे. रस्ता ओलांडताना सर्व बाजूंना पाहूनच रस्ता ओलांडला पाहिजे आणि स्वतःच्या जिवाची काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. पोलीस निरीक्षक सांगळे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. तुम्हाला काही त्रास होत असेल, तर आम्हाला कळवा, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी तत्काळ शाळेमध्ये उपस्थित राहून तुमची सुरक्षा केली जाईल, याची ग्वाही दिली. यावेळी पो.कॉ. विकास साळुंके, वासू भोकरे, पोलीसमित्र रणजित उंद्रे, संजय बजगुडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजित बडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. एन. गायकवाड यांनी मानले.