गेटपाससाठी ८० हजारांची लाच घेताना परळी थर्मलमधील अभियंता जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:13 PM2022-12-27T12:13:45+5:302022-12-27T12:14:40+5:30
२० गेटपाससाठी प्रत्येकी ४ हजार रुपयांची मागणी केली होती
परळी (जि. बीड) : येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख हाताळणी विभागातील राख वाहतुकीसाठी २० गेटपास देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसमासह उपकार्यकारी अभियंता जाळ्यात अडकला. ही कारवाई सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शक्तीवसाहतीतील निवासस्थानीच केली. यात दोघेही ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख हाताळणी विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिल वाघ (रा. शक्तिकुंज वसाहत, परळी) यांनी तक्रारदाराकडे राख वाहतुकीसाठी २० गेटपास देण्यासाठी प्रत्येक गेटपासला चार हजाराप्रमाणे एकूण ८० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खाजगी व्यक्ती आदिनाथ खाडे (रा. शिवाजीनगर, परळी) याच्याकडे देण्यास सांगितले. याची २२ डिसेंबर रोजी लाच पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी खाडे याने ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर खाडेने वाघ याला पैसे स्वीकारल्याचे सांगितले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही शक्तिकुंज वसाहतीत परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र परदेशी, अमोल धस, पोलिस अंमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, भारत गारदे, अविनाश गवळी, वाहन चालक गणेश म्हात्रे यांनी केली.