परळीच्या थर्मलला आधी पाण्याची तर आता कोळशाची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 07:06 PM2019-09-25T19:06:54+5:302019-09-25T19:09:23+5:30
संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे
- संजय खाकरे
परळी : तालुक्यातील दाऊतपूर च्या नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ६ हा गेल्या पंधरा दिवसांपासून कोळशाच्या तुटवड्या मुळे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या एकच संच क्रमांक ७ हा चालू असून या संचातून बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास १८४ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. संच क्रमांक ८ अनेक दिवसानंतर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. संच क्रमांक ८ हा तीन दिवसात चालू होईल व त्यातून वीज निर्मिती सुरू होईल. मात्र संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. संच क्रमांक ६,७,८ या तीन संचाची स्थापित क्षमता एकूण ७५० मेगावॅट एवढी आहे. बुधवारी दुपारी यातील केवळ एकच संच चालू होता. यातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. यामुळे नवीन परळी विद्युत केंद्रात एकूण ५६६ मेगावॅट ची तूट भासली. संच क्रमांक ६ हा कोळसा साठा शिल्लक नसल्याने पंधरा दिवसांपासून बंद ठेवला आहे.
एका संचास दररोज लागतो ४ हजार टन कोळसा
एका संचाला वीज निर्मितीसाठी दररोज ४ हजार टन कोळसा लागतो, चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून दररोज रेल्वेचे एक रॅक कोळसा येत आहे. एका रॅक मध्ये ३५०० टन कोळसा असतो, तर कधी हैद्राबाद येथून कोळसा येतो. संच क्रमांक ८ च्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे तो संच तीन दिवसात कार्यान्वित होईल. खडका बंधाऱ्यात जायकवाडी चे पाणी सोडल्या पासून परळीचे संच टप्प्याने सुरू करण्यात आले. पाण्याचा प्रश्न सुटला असता आता कोळशाचा तुटवडा भासला आहेत आहे. संचं क्रमांक 6 हा बंद ठेवला.
कोळसा कमतरतेने संच क्रमांक ६ हा बंद ठेवला आहे. तर संच क्रमांक ८ तीन दिवसात सुरू होईल. यासाठी कोळसासाठा शिल्लक आहे. संच क्रमांक ८ सुरू झाल्यास वीज निर्मितीत वाढ होईल - नवनाथ शिंदे, मुख्य अभियंता