परळीत जहीर खानने जागवली श्रीरामपूरची आठवण; धनंजय मुंडेंकडून स्टेडियमची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:22 AM2024-03-04T11:22:38+5:302024-03-04T11:24:43+5:30
मंत्री धनंजय मुंडे यांनी या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात दोन्ही दिग्गज क्रिकेटर्संना बोलावून येथील क्रिकेट मैदानाची घोषणाही केली.
मुंबई - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून आमदार आहेत. आपल्या परळीतील तरुणाईसाठी, नागरिकांसाठी ते नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणीही पाहायला मिळते. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना धनंजय मुंडेंनी परळीत आणले आहे. आता, सेलिब्रिटी क्रिकेटर्संही त्यांनी परळीच्या मैदानात उतरवल्याचं दिसून आलं. परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून २५ जानेवारीपासून आयोजित नामदार चषक डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू जहीर खान आणि युवराज सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मंत्री धनंजय मुंडे यांनी या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात दोन्ही दिग्गज क्रिकेटर्संना बोलावून येथील क्रिकेट मैदानाची घोषणाही केली. या स्पर्धेच्या माध्यमातून परळी शहर व ग्रामीण भागातून तब्बल ३५०० खेळाडूंनी सहभाग घेतला. भविष्यात या खेळाडूंमधून ७०० खेळाडूंची निवड करून २० फ्रेंचाईजीमार्फत त्यांचा लिलाव करून भव्य स्वरूपात परळी प्रीमियर लीगचे आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार असल्याचे मुंडेंनी म्हटले. रणजीमध्ये मराठवाड्याचा स्वतंत्र संघ असता तर कदाचित आमच्या पिढीतील अनेक खेळाडूंना रणजीसह देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असती. मात्र, आता पुढील पिढीतील प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी यासाठी परळी येथे लवकरच सुमारे ६५ कोटी रुपये खर्चून भव्य स्टेडियम व क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे, अशी घोषणाचा धनंजय मुंडेंनी या सोहळ्यात केली.
दरम्यान, याप्रसंगी जहीर खान आणि युवराज सिंग यांचे कौतुकही मुंडेंनी केले. आपल्या शरीरात वाढत असलेल्या कॅन्सरवर मात करून युवराज सिंग ने देशासाठी अनेक रेकॉर्ड स्थापित केले. युवराज सिंग आज प्रथमच परळीत आले, प्रभू वैद्यनाथांच्या चरणी युवराज सिंग यांना उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करत असल्याचेही मुंडेंनी यावेळी बोलताना म्हटले.
जहीरने सांगितली अहमदनगरची आठवण
मी अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमधून टेनिस बॉलनेच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, आणि पुढे खेळत गेलो. परळीत येऊन ग्रामीण भागात क्रिकेटचे एवढे भव्य आयोजन पाहून मला अतिशय आनंद झाला. परळीत खेळले जाणारे हे क्रिकेट एक दिवस देशात आणि देशाबाहेर नक्कीच पोहोचेल, असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन यावेळी, जहीर खानने परळीतील कार्यक्रमात केले.